Nashik Crime News नाशिक : मंगळवारी रासबिहारी लिंक रोड येथे एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) तरुणीच्या प्रियकरास जेरबंद केले आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोडवरील (Rasbihari Link Road) एका मोकळ्या जागेत आढळून आला होता. पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) मुलीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता. 


मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात


मुलगी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नाक्यावरील एका परिचारिका महाविद्यालयात परिचारिकेचे शिक्षण घेत होती. ती मुलगी आणि सागर तडवी यांची जुनी मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मुलगी अंबड (Ambad) येथे राहत असलेल्या सागरच्या घरी गेली. रात्री एक ते दीडच्या सुमारास ती दुसऱ्या कोणाशी मोबाईल फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. 


ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला


संतप्त प्रियकराने तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून चारचाकीतून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला होता. 


प्रियकरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या


या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित प्रियकरास शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. सागर तडवी (21, मूळ रा. नंदुरबार, हल्ली राहणार, माऊलीनगर, अंबड, नाशिक) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. 


यांनी बजावली कामगिरी


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, रोहित केदार, हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे, अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलीस नाईक नीलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्‍याम महाले, वैभव परदेशी, नितीन पवार, गोरख साबळे, श्रीकांत साळवे यांनी संयुक्तिकरीत्या केली.


इतर महत्वाच्या बातम्या


Amit Shah Nashik Visit : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर, 'हे' आहे कारण


Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर