Nashik News : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सिटी लिंक शहर बस सेवेच्या कर्मचाऱ्यांचं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. शहर बस व्यवस्थापकाच्या मध्यस्थीमुळे तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले असून याबाबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी तपोवन बस डेपोमध्ये तीन तास आंदोलन केले. 


नाशिक सिटी लिंक बस शहर बससेवा गेल्या दीड वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. सिटीलिंक शहर बस सेवेसाठी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या चालक वाहकांनी तब्बल तीन ते चार तास आंदोलन केले. शहरातील सिटीलिंक बस सेवेच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तपोवन बस डेपोत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिटीलिंक बस व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी मध्यस्थी केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


वेळेवर पगार होत नसल्याने आंदोलन
सिटी लिंक शहर बससेवेच्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासून पगार थकलेला असून या पार्श्वभूमीवर त्यांनी संप पुकारला होता. वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे शहर बससेवेच्या पहिल्यांदा बोजवारा उडाला होता. कामावर जाणारे, विद्यार्थी, नागरिक आदींचा खोळंबा होऊन हाल झाले. दरम्यान दुपारी होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


नाशिककरांची गैरसोय
दरम्यान ऐन गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सकाळीच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अचानक बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र साडे अकरा वाजेनंतर बस धावू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.


दोन वाजता बैठक 
दरम्यान सकाळपासून बंद असलेली शहर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र दुपारी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक असून या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या