Nashik News : नाशिक (Nashik) दिल्ली स्पाईसजेट (Spicejet Flight) विमानसेवे संदर्भात आज मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. दिल्लीहून (Delhi) नाशिकसाठी उड्डाण घेतलेल्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं या फ्लाईटचं इमर्जन्सी दिल्लीत लँडिंग करावं लागलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्पाईस जेटच्या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे.


नाशिकसाठी दिल्लीहून (Delhi) आज सकाळी 6.54 ला स्पाईसजेट बी 737 फ्लाइट एसजी 8363 ने उड्डाण केले. मात्र स्पाइसजेटच्या फ्लाइटमधील   'ऑटोपायलट'मधील बिघाडामुळे दिल्लीला परतावे लागले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. वैमानिकाने यशस्वी लँडिंग केल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.


ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू झाली आहे. तेव्हापासून या फ्लाईटला नाशिक करांसह व्यापारी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर 10 ऑगस्टपासून नव्या वेळेत ही फ्लाईट सुरू झाली होती. मात्र आज सकाळी नाशिकला निघालेल्या फ्लाईटला अचानक त्रुटी निर्माण झाल्याने दिल्लीहून निघताच पुन्हा परतावे लागले आहे. 


एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस


स्पाईसजेटचा यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आजच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेत ऑटो पायलट सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने मोठी दुर्घटना घडू शकते, यामुळे कंपनीने उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. तसेच यापूर्वी जुलैमध्ये एव्हिएशन वॉचडॉगने म्हटले होते की स्पाइसजेट सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा इशारा त्यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर एअरलाइनला जास्तीत जास्त 50 टक्के उड्डाणे ऑपरेट करण्याचे आदेश दिले होते.


विमानाचे सुरक्षित लँडिंग


दिल्लीहून नाशिकसाठी उड्डाण केल्यानंतर स्पाइसजेट B737 मध्ये 'ऑटोपायलट' त्रुटी आढळून आली, त्यानंतर तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्याचे ठरविले. त्यानुसार फ्लाइट दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बोईंग 737 विमान सुरक्षितपणे उतरल्याचे त्यांनी सांगितले.


नाशिक दिल्ली वेळापत्रक


दरम्यान 10 ऑगस्टपासून सुरू झालेल्या नाशिक दिल्ली विमान सेवेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सध्याचे वेळापत्रकानुार दिल्लीहून सकाळी 7.56 वा. टेकऑफ नाशिकला सकाळी 9.45 वाजता लँडिंग तर परतीच्या प्रवासात नाशिकहून सकाळी 10.15 वा. टेकऑफ करणार आहे.  दिल्लीत दुपारी 12.15 वाजता लँडिंग होणार आहे. तर 10 ऑगस्टपासून या विमान सेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  दिल्लीहून स. 6.35 वाजता टेकऑफ घेऊन  नाशिकला स. 8.30 वाजता लँडिंग होईल त्यानंतर  नाशिकहून स. 9.00 वाजता टेकऑफ घेऊन दिल्लीत स. 10.45 वाजता लँडिंग होते.