Nashik Rain : गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी दमदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, रायगड परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहयला मिळाले. त्याचबरोबर नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभर नाशिक शहर आणि परिसरात पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा दमदार पावासाला सुरुवात झाल्यानं गंगापूर धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.


गेला आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा राज्यातील काही भागात हजेरी लावली आहे. नाशिक परिसरात आठ दिवसानंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून 2 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. मागील आठवडाभर दडी मारुन बसलेल्या पावसानं मंगळवारी सायंकाळी तासभर मुसळधार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी देखील जोरदार सरी कोसळल्या. तर बुधवारच्या मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं आज सकाळी 8 वाजल्यापासून 2 हजार 500 क्यूसेकने गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. 


जिल्ह्यातील धरण विसर्ग


दरम्यान, बुधवारी रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये गंगापूर धरणातून 2 हजार 500 क्यूसेक, दारणा धरणातून 8 हजार 524,  मुकणे धरणातून 1 हजार 89, कादवा धरणातून 11 हजार 442, वालदेवी धरणातून 407, आळंदी धरणातून 210, भोजापूर धरणातून 110, पालखेड धरणातून 2120, नांदूरमध्यमेश्वर 18 हजार 930 तर होळकर पुलाखालून 7203 क्यूसेकने पाण्याचा प्रवाह गोदावरी नदीपात्रात वाहत आहे.


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


बुधुवारी सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं नंदूरबार जिल्ह्यात हजेरी लावली आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे पाऊस झाला नव्हती. शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर तिथे चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. तसेच वर्धा शहरासह ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: