नाशिक: शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यात दोन घटना समोर आल्या आहेत. चांदवड तालुक्यातील वर्ग 2 च्या अधिकाऱ्यास दहा हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील पोलिसाला दहा हजारांची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज चांदवड तालुक्यात लाच प्रकरण उघडकीस आले आहे. चांदवड कोषागार कार्यालयात उपकोषागार म्हणून कार्यरत असलेल्या सुनील सुभान तडवी या अधिकाऱ्यास लाच स्वीकारली आहे. त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.  


चांदवड शहरातील खंडेराव महाराज मंदिर रोड परिसरात राहणाऱ्या सुनील तडवी हा  कोषागार कार्यालयात वर्ग 2 च्या पदावर कार्यरत आहे. यातील तक्रारदार यांचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि कोणताही आक्षेप न घेण्याच्या  मोबदल्यात पंचासमक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 10 हजार लाचेची मागणी केली. 


दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.  सदर मागणी केलेली 10 हजार रुपयांची लाच सुनील तडवी याने पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शर्मिष्ठा घारगे-वालावलकर  यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पोलिस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव-पाटील यांनी केली असून या पथकात पो.ना.प्रकाश महाजन, पो.ना. नितीन कराड, पो. ना. परशुराम जाधव यांचा पथकात समावेश होता.  


सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक विभागाकडून करण्यात आले आहे.


ही बातमी वाचा: