Nashik ACB Trap : नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली. नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. 


गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती. 


मागील अठरा दिवसांपासून जिल्ह्यात एकही कारवाई झालेली नव्हती. अशातच प्रशासनातील मोठा मासा गळाला लागला आहे. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीत मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी जवळपास एक कोटी रुपयांची दंड आकारणी केली. याविरोधात जमीन मालकाने थेट उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले. या प्रकरणाची फेर चौकशीसाठी तहसीलदार बहीरम आले असता त्यांनी पंधरा लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कळविल्यानंतर बहिरम यास लाच घेताना अटक केली. 


नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 याप्रमाणे दंड आकारणी केल्याबाबत संशयित यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी नाशिकच्या उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. 


सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याच्या जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले होते. जमीन मालकाने सांगितल्यानुसार याच्या पडताळणीसाठी संशयित बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले होते. परंतु जमिनीचे मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी निरीक्षणासाठी पाठवले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज स्वीकारल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.