Gokul Zirwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) अजूनपर्यंत दिंडोरीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या तुलनेत महाविकास आघाडीला अजुनही तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही. या मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून विजयाची हॅट्रिक केली होती. त्यानंतर डॉ. भारती पवार दिंडोरीच्या खासदार बनल्या. महाविकास आघाडीतून उमेदवाराची शोधाशोध सुरु असतानाच आता गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गोकुळ झिरवाळ शरद पवार गटातून लढण्यास इच्छुक
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गोकुळ झिरवाळ इच्छुक आहेत. गोकुळ झिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. निवडणूक लढविण्यासंदर्भातील निवेदन त्यांनी सादर केले आहे. नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार गटात आहेत. मात्र त्यांचे चिरंजीव शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे झिरवळ यांची भूमिका काय? याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
दिंडोरी लोकसभेचा राजकीय इतिहास
दिंडोरी लोकसभा मतदार संघात 2009 मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2 लाख 81 हजार 254 मते मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ यांना 2 लाख 43 हजार 907 मते मिळाली होती. नरहरी झिरवाळ यांचा 37 हजार 347 मताने पराभव झाला होता. 2014 साली भाजपकडून हरिश्चंद्र चव्हाण यांनी 4 लाख 42 हजार 784 मते मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांना 2 लाख 95 हजार 165 मतं मिळाली होती. भारती पवार यांचा 1 लाख 47 हजार 619 एवढ्या मताधिक्याने हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला होता. तर 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर डॉ.भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा 1 लाख 98 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला. आता भाजपने पुन्हा एकदा डॉ. भारती पवारांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी