Dada Bhuse नाशिक : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दीड कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईची आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यावर सरकार चर्चा करेल. हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण समाजाची फसवणूक होईल असे आम्ही वागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे, असे वक्तव्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.

  


स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज आपण साजरा करत आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथे आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधतांना दादा भुसे बोलत होते.  


आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही


मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनावर दादा भुसे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही.  इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या सांगाव्यात. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे.  आनंदाची बाब म्हणजे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल आहे. 


चार हजारापेक्षा अधिक तरुण नोकरीवर रुजू


शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू आहे. सर्वच जण प्रयत्न करत आहेत. काय, काय केलं हे सर्व त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  सर्व मिडियासमोरही काय केले जात आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी कधीही न झालेले निर्णय या सरकारने घेतले आहेत.  4 हजारापेक्षा अधिक तरुण-तरुणींना नोकरीवर रुजू केले आहे. 


कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे


जरांगे पाटील आणि मराठा समाजाला विनंती असणार आहे की, यात काय केले पाहिजे सांगावे. यात सरकार मार्गक्रमण करेल. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दीड कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईची आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यावर सरकार चर्चा करेल. हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण समाजाची  फसवणूक होईल, असे आम्ही वागणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, कोर्टात आरक्षण टिकलं पाहिजे, असेही दादा भुसे म्हणाले. 


मुख्यमंत्रीनी शिवाजी महाराजांची घेतली शपथ


यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत काहीही होत नव्हतं. मुख्यमंत्रीनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करत आहेत. दीड लाख कर्मचारी यावर काम करत आहे. मुख्यमंत्री चर्चेसाठी अंतरवलीला सुद्धा गेले होते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.