नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलकांकडून राज्यभरात विविध लोकप्रतिनिधींना अडवले जात आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मराठा आंदोलकांनी अडवलं आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणी मराठा आंदोलकांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल 


विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गाडी अडवून घोषणाबाजी आणि आंदोलन केले होते. मराठा आंदोलकांनी कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीररित्या जमाव जमवून आरक्षणाचा मुद्द्यावर घोषणाबाजी करून तणाव निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


नेमकं काय घडलं? 


नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर नाना पटोले यांच्या गाडीत असलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांना अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर नाना पटोले यांना घेरलं. मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांची गाडीखाली उतरून भेट घेतली. मराठा आंदोलकांसोबत चर्चा करताना नाना पटोले यांनी आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन दिले. आगामी काळात आम्हीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही आहोत. हा लढा आम्ही देखील लढणार आहे, असे देखील नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांना सांगितले. तर नाना पटोले यांच्यासोबत बोलताना मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. सक्षम विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला द्या, अशी विनंतीदेखील मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्याकडे केली. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Congress : नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण


Devendra Fadnavis : मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक, देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'तुम्हाला निव्वळ राजकारण करायचंय'