नाशिक : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूर सारख्या घटना होऊ नये, पण त्याचे राजकारणही होऊ नये. 2020-21 साली ज्या घटना घडल्या तेव्हा तुमचे सरकार होते. तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाहीत.  तुम्हाला निव्वळ राजकारण करायचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. नाशिक येथे आयोजित महिला सशक्तीकरण मेळाव्यातून ते बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक ही केवळ श्रीरामाची नाही तर सीता मातेचीही भूमी आहे. या नगरीत नारीशक्तीचा जागर करायला आलो आहे. अहिल्याबाई होळकर यांनी इथे घाट उभारले आहेत. स्त्री शक्तीचा मोठा इतिहास आहे. 2047 चा विकसित भारत तयार करायचा असेल तर 60 टक्के महिला अर्थ व्यवस्थेचा भाग होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, म्हणूनच आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. 


त्यांना 1500 रुपयांचे मोल काय कळणार?


ते पुढे म्हणाले की, तोट्यात असलेली एसटी बस फायद्यात आली. तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी आमची बहीण जाऊन येते. 560 कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना सरकार फी देत आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये देत आहोत. विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे. पहिल्या टप्प्यात 1 कोटी महिलांना पैसे दिले. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत तोपर्यंत योजना कोणी बंद करू शकत नाही. आम्हाला बहिणींच्या प्रेमात रहायचे आहे. आई बहिणीचे प्रेम कोणी विकत घेऊ शकत नाही. जे सोन्याचा चमचा घेऊन आलेत 1500 ची हॉटेलमध्ये टीप देतात त्यांना 1500 रुपयांचे मोल काय कळणार? असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. 


तुम्हाला निव्वळ राजकारण करायचंय


बदलापूर सारख्या घटना होऊ नये, पण त्याचे राजकारण होऊ नये. काही लोक मतासाठी मिंध्ये झालेत. आरोपीला फाशी देणार आहे. हा समाजाचा प्रश्न आहे, जो पर्यंत महिला मुलींना सन्मान देणार नाही, तो पर्यंत विकृत प्रवृत्ती राहतील. पण त्यांना आम्ही ठेचणार आहोत. महाराष्ट्र बंदची काही पक्ष घोषणा देत आहेत. 2020-21 साली ज्या घटना घडल्या तेव्हा तुमचे सरकार होते. तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाहीत. कलकत्तामध्ये इतका निर्घृण प्रकार झाला तरी तुम्ही काही बोलले नाही. तुम्हाला निव्वळ राजकारण करायचे आहे, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. आमच्या ताई म्हणाल्या की, माझी सुरक्षा काढा आणि मुलींना द्या, मागील काळात निर्भया सुरक्षेच्या गाड्या त्यांच्या सुरक्षेसाठी लागल्या तेव्हा या महिला बोलल्या नाही, असा पलटवार त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्यावर केला. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य, महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, कायदेशीर कारवाईचे आदेश