नाशिक : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आतापर्यंत तब्बल पाच वेळा उपोषण केले आहे. यंदाचे मनोज जरांगे यांचे आंदोलन पाच दिवस सुरु होते. मात्र त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. आता मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यात (Yeola) करावे, अशी मागणी पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.  


गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे आता पुढील उपोषण येवल्यात करतील, अशी चर्चा सुरु आहे. मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे येवल्यामध्ये बसले आहेत. आता येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो. छगन भुजबळांनी मराठा समाज आणि धनगर समाजामध्ये वाद लावला आहे. येवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे. येवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल की उपोषण काय असते, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिला होता.


सर्व परवानग्या व सेवेची जबाबदारी पुरवणार, ग्रामसभेत ठराव


मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातही उपोषण करील, असे म्हटल्यानंतर नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण पुरणगावात घ्या, असा ग्रामसभेत ठराव केला आहे. या उपोषणासाठी लागणाऱ्या परवानग्या व सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केला आहे. आता मनोज जरांगे येवल्यात उपोषणाला बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


मनोज जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टीमेटम


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारला नवा अल्टीमेटम दिलाय. त्यांनी म्हटलंय की, गावकऱ्यांनी उपोषण सोडत सलाईन लावण्याची विनंती केली. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे, असे समाजाचे म्हणणे होते. समाजाच्या मायेपोटी उपचार घेतले. सरकार उपोषणच्या शक्तीला घाबरते. पण, आता सलाईन लागली आहे. त्यामुळे उपोषणाचा उपयोग नाही. सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ देत आहे. सरकारनं मागण्या मान्य कराव्यात. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे. ती खुर्ची ओढण्यासाठी मी आता तयारी करणार आहे. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, राणे साहेबांवर मी आणखी उत्तर दिलं नाही, मनोज जरांगे म्हणाले..