नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्यभरात जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. मनोज जरांगे यांची शांतता रॅली विविध जिल्ह्यातून येऊन उद्या (दि. 13) नाशिक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या निमित्ताने त्यांच्या स्वागताची मोठी तयारी नाशिकमध्ये करण्यात आली आहे. सीबीएस येथे मनोज जरांगे पाटलांची जंगी सभा होणार आहे. शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहे. 


शांतता रॅलीच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्याचं काम सुरू असून मनोज जरांगे पाटील उद्या सभेतून नेमकं काय संबोधित करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


सीबीएस येथे रॅलीचा समारोप 


मंगळवारी 13 तारखेला सकाळी तपोवन, नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. तपोवन जुना आडगाव नाका - निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल यामार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील. त्यानंतर सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होईल. 


हे मार्ग असणार बंद 


स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.


पर्यायी रस्ते कुठले? 


छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक मिरची हॉटेल सिग्नल येथून अमृतधाम, तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल, पेठरोडमार्गे मार्गस्थ करण्यात येईल. धुळेकडून येणारी वाहतूक अमृतधाममार्गे तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोडमार्गे मार्गस्थ होईल. दिंडोरी नाक्याकडून येणारी वाहतूक पेठनाका, मखमलाबाद नाका, रामवाडी पुलामार्गे वळवण्यात येणार आहे.  दिंडोरी नाक्याकडून जाणारी वाहतूक तारवाला चौक, हिरावाडीकडून मार्गस्थ तर द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलाकडे पुलाखालून जाणारी वाहतूक द्वारका उड्डाणपुलावरून मार्गस्थ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


वाहनतळ व्यवस्था पुढीलप्रमाणे


छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचवटीतील निलगिरी बाग, दिंडोरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरदचंद्र पवार बाजार समिती येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर घोटी, इगतपुरी, मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी महामार्ग बस स्थानकाशेजारील मोकळ्या जागेत, डोंगरे मैदान आदी ठिकाणी वाहनतळ करण्यात आले आहे.


आणखी वाचा 


Sharad Pawar in Pune: मला श्रीयुत जरांगेंची एक गोष्ट अगदी पटते, रमेश केरेंसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी बेधडक सांगितलं!