नाशिक : आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या वतीने (Pesa Recruitment Committee) प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ईदगाह मैदानावर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आज आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande), आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि माजी महापौर रंजना भानसीं (Ranjana Bhansi) यांना आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


गो बॅक गो बॅकच्या घोषणांनी आंदोलकांनी आंदोलनस्थळ दणाणून सोडले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत लोकप्रतिनिधींना घरी जाऊ देणार नाही. निवडून दिले आहे त्यांनी प्रश्न मार्गी लावावे. इथं येऊन भूलथापा देऊ नये. येथे येणाऱ्या प्रत्येक आमदार - खासदाराला आम्ही घेराव घालू. आम्ही लढा उभारला की मागे घेत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिल्या आहेत. 


आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण 


तर आमदार हिरामण खोसकर बोलत असताना आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. फक्त भाषण नको, निर्णय द्या, अशा भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत असताना आंदोलकांकडून भारती पवारांनाही बोलण्यास विरोध करण्यात आला. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. 


आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकार गंभीर नाही : जे पी गावित 


यावेळी माजी आमदार जे पी गावित म्हणाले की,  कोणीही आले तरी कोणाचेही भाषण मोडून टाकू नका. सर्व पक्षाचे लोक येत आहेत. आपल्याला आपली मागणी मान्य करून घ्यायची आहे. इथे कोणीही राजकारण करणार नाहीत. आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा आहे. अधिकारी आमचे ऐकून घेत नाहीत. आमचे निवेदन उडवून देतात.  आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकार गंभीर नाही, असे यावेळी त्यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar : 'आम्ही कामाचे पैसे देतो, असं काम अपेक्षित नाही', अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले, नेमकं काय घडलं?


Nashik News : विनयभंगाचे प्रकरण समोर आणल्याने मास्तरांची उचलबांगडी, मास्तरांची बदली रोखण्यासाठी नाशिकमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले