नाशिक : मनमाड येथील युनियन बँकेच्या (Union Bank) विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यामुळे बँकेच्या मुदत ठेवीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.या प्रकरणी संशयित संदीप देशमुखला (Sandip Deshmukh) पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  


यानंतर नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी या प्रकरणात लक्ष घातले. घोटाळा करणाऱ्या संदीप देशमुख (Sandip Deshmukh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकणाऱ्या युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात स्वतः आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांसोबत फिर्यादी होवून पोलीसांत तक्रार दाखल केली. येत्या आठ दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पीडित ग्राहक व शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांसमवेत स्वतः युनियन बँकेच्या नाशिक येथील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लोकशाही मार्गाने आंदोलन (Agitation) छेडण्याचा इशाराही कांदे यांनी दिला होता. 


सात ठेवीदारांचे पैसे मिळाले परत


आता युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरणी आता ठेवीदारांना दिलासा मिळू लागला आहे. आमदार सुहास कांदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळू लागले आहेत. एफडी घोटाळा प्रकरणात बँकेने नेमून दिलेल्या एका कर्मचाऱ्याने बनावट पावत्या तयार करत करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांची भेट घेत युनियन बँकेसह अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचा परिणाम म्हणून सात ठेवीदारांचे पैसे मिळाले असून उर्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे लवकरच मिळतील, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.