Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न नाशिककर सातत्याने विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात 16 वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आज विहितगाव (Vihitgaon) परिसरात युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही युवकांनी कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


नाशिक शहरातील गुन्हेगारीचे (Nashik Crime) सत्र थांबायचं नाव घेत नसून कधी कोयता गँगची दहशत तर कधी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची दहशत सुरूच आहे. अशात विहीतगाव परिसरात गावगुंडांकडून रस्त्यावरील चार गाड्यांची कोयत्याने (Koyata Gang) तोडफोड करण्यात आली तर एका अपार्टमेंच्या पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मध्यरात्रीच्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र सततच्या या घटनांमुळे नाशिक पोलिसांचा (Nashik Police) धाक आहे की नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना बघता चिंता व्यक्त केली जात असून प्राणघातक हल्ले, लूटमार, चोऱ्या, तोडफोड या घटना तर जणू नित्याच्याच झाल्या आहेत. खरं तर धार्मिक आणि शांत शहर अशी नाशिकची ओळख.. मात्र वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना अशी भिती आता व्यक्त केली जात आहे. गल्लो गल्ली मोकाटपणे टोळके हातात शस्त्र घेऊन फिरत आहेत, कोयत्याने एकमेकांवर हल्ले चढवले जात आहेत, एवढंच नाही तर गोळीबाराच्याही घटना आता सर्रासपणे समोर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सिडको परिसरात मद्यपी समाजकंटकांनी 16 वाहनांची तोडफोड केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता विहितगाव येथे झाल्याचे दिसून आले. 


दरम्यान दोन संशयितांनी केलेल्या जाळपोळीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पहाटे दोन वाजता कोयता घेऊन संशयित वाहनतळात आले. ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी वाहनतळातील दुचाकी पेटवून दिल्या. नंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने हल्ला करत परिसरात दहशत पसरविली. यापूर्वीही शहरात वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही घटनांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग उघड झाल्याचा इतिहास आहे. आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी तसेच पोलिसांना धडा शिकविण्यासाठी वाहनांची जाळपोळ करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. 


टवाळखोरांची गय केली जाणार नाही ....


नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही युवकांनी कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. पालकमंत्री दादा भूसेंनी दखल घेतली असून नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सीसीटिव्हीच्या आधारे ओळख पटली असून टवाळखोरांची गय केली जाणार नाही, पोलिस आयुक्त यांच्याशी बोललो असून ताबडतोब संशयितांचा शोध घेण्याचा आदेश दिला असल्याचे दादा भुसे म्हणाले. 


इतर संबधित बातम्या : 


Nashik Crime: नाशिकमध्ये कोयता आणि लोखंडी रॉडने 16 वाहनांची तोडफोड, पोलिसांचा वचक नाही, परिसर दहशतीखाली