Nashik Latest marathi News Update : नाशिक जिल्ह्यात (Nashik News) बिबट्याचा हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावातील दिवटे वस्तीवर सहा वर्षीय मुलाचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
नाशिक जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आपला मोर्चा वळविल्याचे या घटनेवरून दिसून येते. जुलै महिन्यातच तालुक्यातील धुमोडी परिसरात आठ वर्षीय मुलगी बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याच परिसरातील वेळुंजे गावानजीक असलेल्या दिवटे वस्तीजवळ बिबट हल्ल्याची घटना घडली आहे.
आर्यन निवृत्ती दिवटे असे या बालकाचे नाव आहे. वेळुंजे गावानजीक चार पाच घरांची दिवटे वस्ती आहे. सायंकाळच्या सुमारास मुलगा घराच्या परिसरात खेळत असताना तसेच परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने सहा वर्षीय मुलावर झडप घातली. त्याला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान दोन तासांपासून वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी शोध कार्य सुरू होते. अखेर मुलाचा मृतदेह शोधण्यात आला आहे.
दरम्यान दिवटे वस्तीच्या मागील बाजूस अंबोली धरणाचे बॅकवॉटर असून संपूर्ण जंगल परिसर आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांसह वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात बॅटऱ्या घेऊन सर्वत्र बालकाचा शोध घेतला जात होता. अखेर दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जंगल परिसरात मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेने संपूर्ण वेळुंजेसह धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :