Nashik Agriculture News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असाताना आता अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. याचा मोठा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष बागांना (Grapes crop) बसला आहे. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या बागांचे मनी गळत आहेत. तसेच पावसामुळं हे द्राक्षाचे मनी कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
द्राक्ष बागांवर रोग पडण्याची शक्यता
द्राक्ष बागा सध्या फुलोऱ्यात आहेत. अनेक ठिकाणी बागांना चांगला मालही लागला आहे. मात्र, अशातच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. याचा मोटा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बुधुवारी नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी पाऊस झाला आणि आज सकाळपासून जिल्ह्यात धुक पसरल्यानं द्राक्ष बागांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औषध फवारणीचा खर्च दुपटीने वाढणार
पहाटेपासूनच द्राक्ष बागांवरील पावसाचे पाणी झटकण्याची धडपड शेतकरी करत आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष मण्यावर आणि पानांवर पाणी साचलं असल्यानं डाग पडण्याची भीती व्यक्त होत आहे. आता औषधं फवारणीचा खर्च दुपटीने वाढणार आहे. बागेत पाणी असल्यानं ट्रॅकटरने फवारणी करता येत नाही. त्यामुळं मजूर लावूनच फवारणी करावी लागणार आहे. मजुरांचा खर्च आणि फवारणीसाठी लागणार वेळ वाढणार आहे.
नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत
द्राक्ष बागांना दवण्या आणि भुरीपासून वाचण्यासाठी हजारो रुपयांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळं बळीराजा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी विविध कारणाने संकटात सापडत आहे. त्यामुळं अडचणीत असणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेत येऊन सरसकट पंचनामे करावेत. तसेच शासनानं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
द्राक्षाबरोबरच डाळिंब, आंबा आणि रब्बी पिकांवर परिणाम
द्राक्षासोबतच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, पुन्हा तेल्या आणि मर रोगानं द्राक्ष आणि डाळिंब बागा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या आंब्याला मोहोर लागला आहे. या पावसानं मोहोर गळून पडू लागल्यानं आंबा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहे. ज्वारीच्या पेरण्या अनेक ठिकाणी लांबल्या असल्या तरी ज्या ठकाणी ज्वारी येऊ लागली आहे, तिथे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी देखील या पावसामुळं अडचणीत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष बागांना मोठा फटका, डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत