Maharashtra Politics Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर शिवसेना नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील वाद आणखीच चिघळू लागले आहेत. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल असा इशारा शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्र-दिवस शिवसेनेसाठी काम केले. या मेहनतीमधून शिवसेना मोठी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग हा विश्वासघात, गद्दारी कोणी आम्ही केली तुम्ही केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही. पचला नाही, मी आज जाहीरपणे बोलणार नाही. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनंतर बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. नाशिकपासून मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्याची सुरुवात केली. मालेगावमध्ये आल्यानंतर त्यांनी विविध योजना, प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या जिल्ह्यात, मतदार संघाचा दौरा केला होता. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा होणार आहे.