Maharashtra Mumbai Rain : राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आमि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत पूरस्थितीची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली. 


गडचिरोलीत पुढचे तीन दिवस रेड अलर्ट 


गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 3 दिवसाचा रेड अलर्ट जारी केला होता. पहिल्या दिवशी जिल्हाभर रिमझिम पाऊस पडला. मात्र रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आलापल्ली गावाला लागून असलेल्या नाल्यांना  पूर आला असून पुराचे पाणी अनेक घरात शिरलं आहे. आलापल्ली गावाला चारही दिशेनं पाण्यानं वेढा दिला आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना मध्यरत्री घरातील सामान, गाडी व इतर वस्तू घेऊन सुरक्षितस्थळी जावे लागले. 



नंदूरबार पाऊस


हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. जिल्ह्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



अकोला आणि वाशिममध्ये जोरदार पाऊस


गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळं अकोला जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. बाळापूर तालुक्यातल्या कारंजा रमजानपुरचा पानखास नदीवरील लघुप्रकल्प 100 टक्के भरला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने अंत्री परिसरात पानखास नदीला पूर आला आहे. तसेच
वाशिम जिल्ह्यात सकाळपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तिथे सध्या दाट ढगाळ वातावरण असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.



वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा


हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार, 14 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दिनांक 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मीमी. म्हणजे 42.9 टक्के (जुन ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


यवतमाळ पाऊस


फुलसावंगी ते ढाणकी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरु आहे. त्या ठिकाणी पर्यायी बनवलेला पुल पावसाने वाहून गेला आहे. मुसळधार पावसाने येथील ढाणकी ते फुलसावंगी रस्त्यावरील पर्यायी पूर वाहून गेला. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला.