Nashik Rain Update : राज्याच्या मुबंई (Mumbai), कोकण, पुणे भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मात्र नाशिक जिल्ह्याचा काही भाग आजही कोरडाच आहे, ऐन उन्हाळ्यात रखरखीत उन्हात जसे शेत कोरडे असते तसेच शेत आजही कोरडेच आहे. नांगरणी मशागत करून ठेवली, मात्र अद्याप शेतात पेरणी नाही, शेत अक्षरशः उजाड पडले असून बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात कोरडीठाक पडलेली जमीन आहे, नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील. नाशिकहून सिन्नरकडे जातांना रस्त्याच्या दुतर्फा अशीच ओसाड जमीन नजरेस पडते आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यानं पुढचं संकट किती गहिरे असेल, याची जाणीव होते. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा (Surgana) तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र चांदवड, निफाड, सिन्नर (Sinnar) या तालुक्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. चातका प्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणारे हे आहेत. सिन्नरच्या वावी गावातील शेतकरी हरी कासार म्हणतात की, शेताची नांगरणी झाली, मशागत झाली. बी बियाणे ही तयार ठेवले. मात्र पाऊसच नसल्यानं सारी धडपड व्यर्थ ठरली आहे. पाऊस पडेल, या आशेने एक एक दिवस ते पुढे ढकलत आहेत.
जुलै महिनाही शेवटाकडे आला तरीही शेत कोरडेच आहे. कुटुंबीय रोज शेतात येतात, शेताची निगा राखतात आणि रिकाम्या हाताने घरी परततात. पाऊस नसल्यानं उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे करावे तरी काय? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पेरणी (Crop Sowing) झाली नाही, एवढ्यावरच शेतकऱ्यांचे संकट थांबले नाही. तर पाऊस नसल्यानं अनावश्यक खर्च ही वाढत चालला आहे. जनावरांच्या चारा पाणीसाठीही आता खर्च करावा लागत असून चारा पाणी विकत घेणायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. जनावरांचा चाराही शेतात उभा नसल्यानं त्यासाठी दर दोन दिवसाला चार ते पाच हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात 69 टक्क्यांपर्यंत पेरणी
शेततळे उभे केले, मात्र त्यात टँकरच्या माध्यमातून पाणी टाकून जनावरांची तहान भागविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असल्यानं दोन तीन दिवसांनी दोन हजार खर्च करून पाण्याचा टँकर बोलवावा लागत आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची भावना व्यक्त होत असून सरकारने कृत्रिम पावसाची तयारी करावी, अशी मागणी ही ग्रामीण भागातून होत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्याच्या एकूण सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्यानं नाशिक जिल्ह्यात 69 टक्के पर्यंत पेरणी पूर्ण झाल्या आहेत. पावसाचे प्रदेश असणाऱ्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागात भाताची लागवड झाली आहे.
दुबार पेरणीचे संकट ?
तर निफाड, येवला, सटाणा भागात मका, सोयाबीनसह भाजीपाला घेतला जातो. मात्र त्याची काही ठिकाणी पावसाने पुन्हा उसंत घेतल्यानं दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होते आहे. पुढील आठ दिवसात पाऊस झालं नाही तर रोप करपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याच्या इतर भागात नद्या नाल्याना पूर आला असून ओला दुष्काळ येतो कि काय, अशी परिस्थिती असताना नाशिक जिल्हातील शेतकऱ्यांना मात्र कोरड्या दुष्काळाची भीती सतावत आहे. निसर्ग शेतकऱ्यांची साथ देतो का? पाऊस पडत नाही, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार का? काय उपाय योजना करणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या :