Nashik Crime : नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना उघडकीस आली आहे. मुंबई (Mumbai) येथील प्रवीण मधुकर दिवेकर या व्यक्तीचा गळा चिरून, डोक्यात बियरची बाटली फोडून खून (Murder) करण्यात आला आहे. संशयित घटनस्थळावरून मयताचा मोबाईल, वाहन घेऊन फरार झाल्याने खून कुणी व का केला याविषयी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याची चिन्हे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून अधोरेखित होत आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला की काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रोजच घडणाऱ्या घटनांनी शहर हादरत आहेत. अशातच मुंबई येथील प्रवीण मधुकर दिवेकर हे मागील पंधरा दिवसांपासून ते जेलरोड (Jaiload) येथे एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांना आजूबाजूला कोणीही ओळखत नव्हते. मात्र प्रविणची मुलगी फोन करून विचारपूस करत असे. दरम्यान सोमवारी सकाळी मुंबईहून दिवेकर यांचे आई-वडील नाशिकला खरेदीसाठी आल्यावर मुलाला भेटण्यासाठी घरी आले. तेव्हा प्रवीण दिवेकर जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. 


त्यावेळी मृत दिवेकर यांच्या गळ्यावर विळीने वार करण्यात आले असून मद्याच्या बाटल्या फोडून काचांनी त्यांच्या शरीरावर वार करण्यात आलेले होते. सदरची घटना सोमवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. तर, रविवारी रात्री प्रवीण दिवेकर यांनी कुटुंबियांना फोन करून बोलल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत नमुने संकलित केले आहेत तर, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेत फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सद्यस्थितीत संशयितांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडली का? यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


जानेवारीत मुलाची आत्महत्या 


जेलरोडला मृतावस्थेत आढळून आलेल्या प्रवीण दरेकर यांचे आईवडील मुंबईला राहतात. मात्र त्यांची पत्नी नाशिकमध्ये उपनगरला राहत असल्याने ते देखील काही दिवसांपूर्वी नाशिकला आले होते. तर त्यांच्या 22 वर्षीय मुलाने जानेवारी महिन्यात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना कौटुंबिक वादातून घडली की हत्येमागे अन्य काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 


नाशिकची वाढती गुन्हेगारी 


खरं तर धार्मिक आणि शांत शहर अशी नाशिकची ओळख.. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना अशी भिती आता व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं असून शहरात पोलीस आहेत का? असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलांचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभ ठाकलं असून यामुळे पोलीसही हतबल झाल्याचं बघायला मिळत आहे.