Nashik Crime : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील दहिदी गावातली घडलेल्या क्रूर खुनाचा (Murder) उलगडा झाला असून अतिशय निघृणपणे दागिन्यांसाठी महिलेला संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खुनातील संशयिताला नाशिक ग्रामीण पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून केवळ दागिन्यांसाठी महिलेला संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. 


मालेगाव तालुका पोलीस ठाणे (Malegaon Police) हद्दीतील दहिंदी गावचे शिवारातील पाणताची शेवडी परीसरातील सुमनबाई भास्कर बिचकुले यांना अज्ञात संशयिताने फावडीने किंवा धारदार हत्याराने जीवे ठार मारुन खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत संशयिताने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत वन जमिनीत दगड मातीखाली लपवले होते. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास सुरु असताना तालुक्यातील एका शेजावळ गावातील तरुणाने दागिन्यांसाठी महिलेचा जीवच घेतल्याचे उघडकीस आले आहे. 


पाठलाग करत संशयित ताब्यात


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ पथके तयार करत तपास सुरु केला. घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलीस पथकांनी घटनास्थळी ठिया मांडून अहोरात्र तपास सुरु करुन घटनास्थळी मिळून आलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघीतलेल्या संशयिताच्या वर्णनावरुन शोध सुरु केला. त्याप्रमाणे पोलीस पथकाने डोंगराळे गावाजवळील तलावात धाव घेऊन संशयिताचा पाठलाग केला असता त्याने बाजूचे तलावात उडी मारली, त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने तलावात उड्या टाकून त्यास पाण्याबाहेर काढले. अशा पद्धतीने थरारक पाठलाग करत पोलिसांनी संशयित किरण ओमकार गोलाईत याला ताब्यात घेतले. 


थरकाप उडवणारी घटना 


सोमवारी दुपारचे सुमारास दहिदी गाव वनजमिनीलगत असलेल्या शेतात एक महिला एकटीच काम करत असल्याचे पाहून, तिला पाणी पिण्याचे आणि मोरेवाडी गावाचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर अंगावरील सोन्याचांदीचे दागिने चोरण्याचे उद्देशाने तिचा साडीने गळा आवळून आणि फावड्याने वार करुन खून केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि हातातील चांदीच्या पाटल्या काढून घेतल्या. पायातील चांदीचे वाळे काढण्यासाठी तिचे पाय फावड्याने तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तसे न झाल्याने मृतदेह मोटर सायकलवर टाकून सुमारे एक किमी दूर अंतरावर वनजमिनीतील नाल्यात घेऊन गेला. त्यानंतर त्याने चार किलोमीटर असलेल्या करंजगव्हाण गावात जाऊन कोयता खरेदी करत पुन्हा घटनास्थळी आला. महिलेचे दोन्ही पाय घोट्यापासून कापून त्याने तिच्या पायातील चांदीचे वले काढून घेतले.