Nashik News : नाशिक (Nashik) शहरात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गजबजलेल्या परिसरात वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अनेकदा अवजड वाहने दुचाकी धारकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. अशीच एक घटना इंदिरानगर परिसरात घडली आहे. अवजड ट्रकने दुचाकीस्वार महिलेस चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


नाशिक शहरात (Nashik City) अपघातांच्या (Accident) घटना नित्याच्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) वारंवार जनजागृती होत असताना अपघाताच्या घटनांना निमंत्रण दिले जात आहे. अनेकदा शहरातील विविध भागातून अवजड वाहतूक बंद असताना देखील वाहतूक केली जात असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिक शहरातील वडाळा गावातील गॅस गोदाम अवजड ट्र्कने (Truck Accident) चिरडल्याने दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.


पुणे-नाशिक महामार्गावरून सोमवारी (15 मे) दुपारी 12 वाजेच्या सुमारास वडाळा गावातून मुंबई महामार्गाकडे अवजड ट्रक भरधाव वेगाने गॅस गोडाऊन लगतच्या रस्त्यावरुन जात असताना दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार आम्रपाली डेंगळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. घटनास्थळी जमलेली गर्दी पोलिसांनी पांगवली. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. वडाळा पाथर्डी रोडवर अवजड वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्याथ्यांसह नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. मात्र बेशिस्तपणे आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनावर नाशिक शहर वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


निवेदन, आंदोलने झाली, मात्र..... 


नाशिक शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुमारे तीन वर्षापूर्वी सर्कल द्वारका सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्री श्री रविशंकर मार्गावरुन वडाळागाव, इंदिरानगर मार्गे पाथर्डी फाटा या रस्त्यावरुन प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावर कंटेनर, टँकर, ट्रेलरसारखे अवजड वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असून अशाप्रकारच्या अपघातामध्ये नागरिकता जीव गमवावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अवघड वाहतूक बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. उपोषणही करण्यात आले होते. तरीही अद्याप अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. त्यामुळे आज एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर अवजड वाहतूक बंद होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.