Nashik crime : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत चालली असून यामुळे शहराची प्रतिमा मालिन होत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारीत पुरुषांसह महिला देखील सहभागी असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येते. नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून दुसऱ्या पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने एका डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिकच्या अंबड लिंक परिसरात पत्नीने आपल्या पतीचा टॉवेलने आवळून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता डॉक्टर पत्नीने पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गजबजलेल्या म्हसरूळ परिसरात दुसऱ्या पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने एका डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून आपापसातील वादातून तसेच कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारीनूसार दहा सप्टेंबरला म्हसरूळ परिसरातील नामांकित डॉक्टर सतीश देशमुख यांना त्यांची दुसरी पत्नी आणि तिच्या मित्राने भुलीच्या इंजेक्शनचा अधिक डोस देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरने त्यांच्या कौटुंबिक व्हॉट्स ऍप गृपवर याबाबत पोस्ट करताच ही बाब समोर आली होती. दरम्यान डॉक्टर देशमुख यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून 24 सप्टेंबरला पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
डॉक्टर पती देशमुख याचे संबंधित महिलेवर प्रेम होते. त्या प्रेमातून त्यांनी रजिस्टर मॅरेज केले. मात्र या दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे डाॅक्टर पतीला समजल्यानंतर त्याने याबाबत दुसऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकराला याबाबत विचारणा केली. यावरून या तिघांत वाद झाला. या वादानंतर दुसऱ्या पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पहिल्या पत्नीची आत्महत्या
दरम्यान डॉक्टरांना भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांच्या मुलाने याबाबत तक्रार दिली. हा मुलगा डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीचा आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांचे सध्याच्या संशयित पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्याच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून घेतली. पहिल्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने ते पाच सहा वर्षांपासून जेलमध्ये होते. त्यानंतर पुन्हा हे एकत्र आल्यानंतर विवाह केला. मात्र संबंधित महिला पुन्हा दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने ही घटना घडली.