CM Eknath Shinde : नाशिक (Nashik) शहरातील तपोवन साकारण्यात आलेले स्वामीनारायण मंदिर (Swami Narayan Mandir) हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्काराचे जतन आणि नाशिक शहराची शोभा वाढवणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंदिराच्या प्रतिष्ठापने निमित्त बोलताना केले. शिवाय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी 'मुख्यमंत्री झालो आहे, ही सर्व स्वामीनारायणांचीच कृपा' असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
नाशिक येथील बी.ए.पी.एस. स्वामीनारायण मंदिर वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याचे भाग्य मला लाभले होते, त्यानंतर आज या मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभ देखील माझ्या हस्ते पार पडला याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्काराचे जतन करणारे ठिकाण आहे राष्ट्रीय एकात्मता ही खऱ्या अर्थाने मंदिराच्या माध्यमातूनच टिकून राहत असते तीन वर्षात नाशिकमध्ये मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरात येऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
नाशिक शहरातील तपोवन परिसरात असलेल्या केवढी वनात श्री स्वामीनारायण स्वामीनारायण यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून आजपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की श्री स्वामीनारायण यांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो आहे. या मंदिराचा 11 नोव्हेंबर 2017 मध्ये ज्यावेळी शिलान्यास झाला होता. त्यावेळी मी सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होतो, त्यावेळी फक्त आमदार होतो, परंतु आता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी मी मुख्यमंत्री झालो आहे. ही सर्व स्वामीनारायणाचीच कृपा असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत कलाकुसरीने तीन वर्षात हे मंदिर पूर्ण करणे हे भगवंताच्या आशीर्वादाने शक्य झाले. स्वामीनारायण संप्रदाय देशात आणि विदेशात भक्ती भावाचे काम करतो. आदिवासी पाड्यावर सुद्धा त्यांचे मोठे काम असून आरोग्य शैक्षणिक तसेच व्यसनमुक्तीसाठी सुद्धा त्यांचे कायम काम सुरू असते. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास येण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
हे सर्वसामान्यांचे सरकार
गेल्या दोन ते अडीच महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले असून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्यातील सर्वसामान्यांना सोबत घेऊन पुढे नेण्याची सरकारचे उद्दिष्ट आहे मागील दोन वर्षांपासून निर्बंधयुक्त असलेले सण उत्सव आता मात्र आमच्या सरकारने निर्बंधमुक्त केले आहेत. त्याचबरोबर आमच्या सरकारला पंतप्रधान मोदी यांचा आशीर्वाद आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी कायम सरकारच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर वेदमंत्र आणि पुरोहितांचा हस्ते संकल्प करून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.