Nashik Water Crisis : एकीकडे उन्हामुळे (Teprature) अंगाची लाही लाही झाली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची उपलब्धता होत नसल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्रतेने जाणवू लागली आहे. अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 52 वाड्या वस्त्यांना 45 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याचे चित्र आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढत असून त्याचबरोबर अनेक भागात पाणी टंचाई (Water Crisis) देखील जाणवत आहे. महिला वर्ग दीड दोन किलोमीटर पायी चालून पाण्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून अशा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली असून जिल्ह्यातील अनेक गवे टँकरवर (Water Tanker) आपली तहान भागवत आहेत. मात्र हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात यांना टँकरच्या फेऱ्यांनी शंभरी गाठली असून 82 हजार ग्रामस्थ या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे टँकरद्वारे होत असलेला पाणी पुरवठा ग्रामस्थांना जलसंजीवनी ठरत आहे.
जिल्ह्यात यंदा उन्हासाठी तीव्रतेने जाणवत असल्याने पाण्याची मागणी ही वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहिरी, नाले कोरडे पडले असून झिरा हा एकमेव पर्याय ग्रामीण भागात वापरला जात आहे. मात्र झिरा शोधण्यासाठी देखील दूरपर्यंत पायपीट करण्याची वेळ महिलांसह ग्रामस्थांवर आली आहे. ग्रामस्थांची ही वणवण थांबवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून संबंधित अधिकाऱ्यांना केली जात आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले असून टँकरला मंजुरी मिळण्याचे प्रशासकीय अडसर त्यामुळे दूर झाले आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात आठ तालुक्यांमधील 93 ठिकाणी 45 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. ग्रामीण भागात 52 गावे 41 वाड्या तहानलेल्या असून त्यांना दहा सरकारी तर 35 खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित सर्व गावांमध्ये मिळून टँकरच्या 103 फेरा मंजूर असून त्यापैकी एकशे दोन फेऱ्या सुरु असून सध्या टँकरद्वारे 82 हजार गावकऱ्यांची तहान भागवण्याचे काम सुरु आहे.
जिल्ह्यात 45 टँकरद्वारे पाणीपुरवठा
दरम्यान आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता येवल्यात सर्वाधिक गावे तहानलेली असल्याचे निदर्शनास आले असून तालुक्यात 25 गावे आणि दहा वाड्या अशा 35 ठिकाणी 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात टँकरच्या दररोज 40 फेऱ्या होत असून 31 हजार 156 रहिवाशांना पाणी पुरवले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील टँकर पुरवठ्याची आकडेवारी पाहिली असता देवळा तालुक्यात एक गाव, बागलाण तालुक्यात 1 गाव, इगतपुरी तालुक्यात 19 गावे, चांदवड तालुक्यात सात गावे मालेगाव तालुक्यात 15 गावे, येवला तालुक्यात 35 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यंदाही पाणीटंचाईचा सामना
तर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ, सुरगाणा, इगतपुरी आदी आदिवासी तालुक्यामध्येही दरवर्षीं प्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यांमधील अनेक गावात जल जीवन मिशनची अनेक कामे झाले असताना देखील पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र पाहण्यासाठी आजही वणवण करावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातला अनेक भागात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र अद्यापही येथील महिलांचे दीड किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर डोक्यावर पाणी नेणे थांबलेले नाही सद्यस्थितीला विहिरीत बाहेरुन आणून टॅंकरने पाणी ओतावे लागत आहे