Nashik NCP : 'भाजपचा (BJP) रखवालदार ईडीचे रक्षण करतो, भाजप हटाओ लोकशाही बचाओ, 50 खोके, ईडी ओके' अशी घोषणाबाजी करत नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्याविरोधात ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीचा निषेध नोंदवण्यात आला. ईडीचा गैरवापर असाच सुरु राहिल्यास येत्या काळात आम्ही महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरु असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (NCP) सरकारला देण्यात आला आहे.
ईडीचा गैरवापर करुन जयंत पाटील (Jayant Patil) यांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेस (एनसीपी) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हातात निषेधाचा फलक घेऊन निदर्शने केली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है.... पन्नास खोके, ईडी पण ओके अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आयएल अँण्ड एफएससोबत कोणताही संबंध नसताना त्यांच्यासोबत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीने त्यांना चौकशीकरीता समन्स बजावला. सत्तेचा गैरवापर करत भाजपा सक्तवसुली संचालयाने ED च्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतील नेत्यांना लक्ष केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दुटप्पी आणि कुटील धोरणांच्या विरोधात आपण उचित कारवाई करुन लोकशाही वाचवावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीकडून देण्यात आले.
जयंत पाटील निर्दोष बाहेर पडतील....
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह सेनेचे नेते संजय राऊत यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर वापर केला जात आहे. केंद्रीय यंत्रणा सूडाच्या भावनेतून सगळ्यांची चौकशी करत आहे. जयंत पाटील हे आमचे खंबीर नेते आहेत. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जात असताना सुद्धा त्यांच्यावर राजकीय दबावाचे षडयंत्र आणले जात आहे. ते या दबावापुढे झुकणार नाहीत. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही ते निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांची तीन तास चौकशी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी ते अकरा वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. त्यांनतर ईडीकडून IL & FS प्रकरणी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ईडी कार्यालयात तीन तास चौकशी करण्यात आल्याचं समजते. दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. नाशिकमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.