Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तसेच गुरुवारपर्यंत रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आल्याने पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यातील सुरगाणा (surgana) तालुक्यातील तलावाचा सांडवा फुटल्याने गावात पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक घरांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर नागरिकांनी वेळीच पळ काढल्यामुळे मोठी जीवितहानी तळली आहे. 


सुरगाणा जवळील अलंगुन हे पंधराशे वस्तीचे गाव आहे. या परिसरातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गावाजवळील तलाव तुडुंब भरला आहे. तलाव ओव्हर फ्लो झाल्याने स्थानिक नागरिकांनी सांडवा रुंद करून पाणी काढून देणार होते. मात्र घडलं भलतंच, मातीचा भराव ढासळून गेल्याने तलावातून पाणी बाहेर पडले. दरम्यान घटनास्थळी कुठलीही जीवितहानी झाली नसती तरी अनेक घरांत पाणी घुसले आहे. सांडवा फुटल्यानंतर पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांसह  गाळ वाहून गावात शिरला आहे. 


गेल्या सहा दिवसांपासून अलंगुण परीसरात अती मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळें अलंगुण तोरांडाँगरी रस्त्यावर असलेल्या अलंगुण गावी असलेला गावबंधारा ओव्हर फ्लो झाला. गेल्या उन्हाळ्यात बंधाऱ्यातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणी साठा करून गावं व परीसरातील शेती व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होणार होती. मात्र यावर्षी सलग सहा दिवस रात्र मुसळधार पाऊस पडत असल्याने ओव्हरफ्लो झाले होते. यासाठी गेल्या तीन दिवसापासून अलंगुण येथील गावकरी सांडवा मोकळा करीत होते, परंतु संततधार पावसाने पाण्याची पातळी वाढत गेली. आणि शेवटी तलावातून पाणी बाहेर पडले. 


दरम्यान अलंगुन परिसरात आज पहाटेपासून अतिमुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी स्थानिक माजी आमदार जे पी गावित यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने सांडवा काढण्याचे काम सुरु होते. मात्र हे काम सुरु असताना जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याच्या दाब वाढत गेल्याने, मातीचा भराव कोरून पाणी बाहेर पडले. यानंतर मात्र सांडव्यातून तलावाचे रौद्र रूप धारण केलेले पाणी गावात घुसले. यावेळी नदी काठाच्या काही घरांमध्ये हे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. 


नेमकं झालं काय?
तलाव फुटला नसून तलाव पूर्ण भरल्यामुळे व सांडव्याला पाणी कमी जात असल्याने गावातील ग्रामस्थांनी सांडवा रुंद करायचे ठरवले होते. दरम्यान हे काम  सांडवा रुंद करत असताना जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू झाला. आणि प्रवाहाचे पाणी थेट गावात घुसले. घराघरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे, सुंदैवाने नागरिकांनी वेगळीच सावध झाल्याने जीवितहानी टाळली आहे. आता सध्या स्थितीत परिस्थिती आटोक्यात आली आहे, मात्र पुराबरोबर अनेक झाडे, कचरा, गाळ रस्त्यावर, घरात घुसलं आहे. शिवाय विजेचे अनेक पोल कोसळले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.