Nashik APMC Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या रणधुमाळीनंतर आज मनमाड बाजार समितीच्या उर्वरित 18 जागांसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेनंतर नांदगाव बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नांदगावसह मनमाड बाजार समिती निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे, राष्ट्रवादीचे माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik APMC Election) बारा समिती निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच गाजली. अनेक बाजार समितीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसला. मालेगावात दादा भुसे (Dada Bhuse), चांदवडमध्ये राहुल आहेर यांना पराभव सहन करावा लागला आहे. आता शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा कस लागणार असून नांदगाव बाजार समितीमध्ये आज सायंकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या बाजार समितीमध्ये 787 मतदार असून 41 उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. 


मनमाड बाजार समिती (Manmad Bajar Samiti) निवडणूक प्रक्रियेत माघारीच्या दिवशी शिंदे, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांनी मतदारांना बाहेर गावी नेले होते. त्यांना मतदान करण्यासाठी खासगी बसेसमधून मतदानस्थळी आणण्यात आले आहे. मनमाड-येवला रोडवर असलेल्या संत झेवियर हायस्कूलमध्ये मुख्य मतदान केंद्र असून या ठिकाणी सोसायटी गट, ग्रामपंचायत गट, व्यापारी गट आणि हमाल मापारी गट अशा चार गटांसाठी चार स्वतंत्र मतदान कक्ष उभारण्यात आले आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. एका मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी असे 24 कर्मचारी असून काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. 


मनमाड बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने सुरक्षिततेच्या पूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस उपधीक्षक, पोलीस कर्मचारी, आर. सी. पी. पथक असा सशस्त्र पोलिस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध तालुक्यातील पाच माजी आमदार, महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. सोसायटी गटातून 11, ग्रामपंचायत गटातून 4, व्यापारी गटातून तर हमाल मापारी गटातून 1 असे 18 संचालक या प्रक्रियेद्वारे निवडून येतील.


नांदगाव समितीची आज मतमोजणी


मनमाड बाजार समितीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर रविवारी सायंकाळी 5 वाजता नांदगाव बाजार समितीची मतमोजणी सुरु करण्यात येणार आहे. नांदगाव येथे नवीन तहसील कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. शुक्रवारी नांदगाव बाजार समितीसाठी 98.50 टक्के मतदान झाले होते. नांदगाव येथेही विद्यमान आमदार सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.