Nashik Accident : नाशिकच्या वणी- सापुतारा महामार्ग (Vani Saputara Highway) अपघाताचे केंद्रबिंदू बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्यात या मार्गावरील चौसाळे फाट्यानजीक व्हेर्ना कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर शनिवारी (29 एप्रिल) पहाटे मजुरांच्या पिकअप वाहनाला अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात एका आठ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. 


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघात (Accident) होत आहेत. त्यातच नाशिकहून वणीमार्गे सापुतारा (Nashik Vani Saputara) जाणारा हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रोजच या मार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. नाशिकहून वणीमार्गे सापुतारा-गुजरात जाता येते. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर खासगी वाहनांची रेलचेल असते. या मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मायेलकींसह एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत. निफाड (Niphad) तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथून गुजरात येथील मजूर घरी परतत असताना सुरगाणा तालुक्यातील हिरडपाडा येथे हा अपघात झाला.


कसा झाला अपघात?


गुजरात राज्यातील (Gujrat) अहवा येथील काही मजूर कामानिमित्त नांदूरमध्यमेश्वर येथे आले होते. काही दिवस थांबल्यानंतर घरी पिकअप वाहनाने परतत होते. नांदूरमध्यमेश्वर येथील काम संपल्यानंतर ही पिकअप रात्री नऊ वाजता निघाली. निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथून इतर मजुरांना घेऊन रात्री 12 वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजता वणी-सापुतारा मार्गावरील हिरडपाडा येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडावर आदळली. यात दोन महिला आणि एका बालिकेचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अर्चना विशाल म्हसे, मीना सोमा गुंबाड, रिहान विशाल म्हसे यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती समजताच सुरगाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह हिरडपाडा येथील पोलीस पाटील रघुनाथ गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात राधा पवार, रत्ना गुंबाड, अमित्रा गुंबाड, यशवंत गुंबाड, सोमा गुंबाड, किरण गुंबाड, वैशाली गांगुर्डे, घडू गांगुर्डे, संगीता गांगुर्डे, संतोष पवार, राहुल पवार, अरुणा पवार, राजू पवार हे मजूर जखमी झाले आहेत.


तिन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


दरम्यान पोलीस व स्थानिकांनी जखमींना तातडीने नजीकच्या बोरगाव आरोग्य केंद्रात दखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींच्या मागणीनुसार सर्व जखमींना गुजरातमधील शामगव्हाण केंद्रात पाठवले. त्यातील गंभीर नऊ जखमींना अहवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तीन मृतदेह सुरगाणा रुग्णालयात आणले. उत्तरीय तपासणीनंतर तीनही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी गुजरातमधील संबंधित गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.