Nashik APMC Election : उद्धव ठाकरेंनी अद्वय हिरेंवर विश्वास दाखवला, महिनाभरापूर्वी मालेगावातील (Malegaon) मैदानावर जंगी सभा झाली अन् तिथूनच सगळी गणिते फिरली. ठाकरेंनी हिरेंवर (Advay Hire) दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत मालेगाव बाजार समिती निवडणुकीत दादा भुसेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला धूळ चारली. आणि अद्वय हिरेंनी दादा भुसेंच्या गेल्या पंधरा वर्षांपासून असलेल्या सत्तेला सुरुंग लावला.  


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणूक (Bajar Samiti Election) रणधुमाळी सुरु आहे. अशातच जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असलेल्या मालेगाव बाजार समितीची निवडणूक देखील चुरशीची होती आणि झाली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल तयार झालं. इकडे उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटात नव्याने दाखल झालेल्या अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल उभे करत रणशिंग फुंकले. मात्र मंत्री असलेल्या दादा भुसे यांचे पारडे जड होते. अनेक वर्षांपासून दादा भुसे यांनी मालेगाव बाजार समितीवर झेंडा फडकवला होता. त्यामुळे मालेगाव बाजार समितीला सुरुंग लावणे अवघड होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिरेंच्या पाठीवर ठेवलेला हात मालेगाव बाजार समितीवर उभा राहिला. आणि पंधरा वर्षांपासूनच्या सत्तेला पायउतार केले. 


मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Dr.Advay Hiray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचा सोसायटी गटातून अकरा पैकी दहा जागांवर विजय झाला आहे. तर एका जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार चंद्रकांत शेवाळे निवडून आले आहेत. एकूण अठरा जागांपैकी अकरा जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून सात जागांची मतमोजणी सुरू आहे. ग्रामपंचायत व्यापारी व हमाल मापारी गटात मतमोजणी अद्याप सुरू आहे. मात्र आतापर्यंतच्या निकालाने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना होम पीचवर मोठा धक्का बसला आहे. 


भुसेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक 


राज्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या मालेगाव बाजार समितीमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांना जोरदार धक्का बसला आहे. बाजार समिती निवडणुकीत सोसायटी गटाच्या 11 जागांपैकी 10 जागेवर महाविकास आघाडीचे नेते व ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे..तर अवघ्या एक जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या ' आपलं पॅनल ' ला  समाधान मानावे लागले आहे...आतापर्यंत 18 पैकी 11 जागांचे निकाल घोषित झाले असून 7 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे. हिरे गटाचा विजय दिसत असतांना अद्वय हिरे यांनी मतदान केंद्रावर भेट दिली..यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष केला.'गद्दार विरुद्ध मतदार ' अशी लढत झाल्याचे हिरे यांनी यावेळी स्पष्ट केले.


मालेगाव बाजार समितीतील विजयी उमेदवार 


सोसायटी सर्वसाधारण गटातुन अद्वय प्रशांत हिरे, चव्हाण विनोद गुलाबराव, इंगळे उज्जैन निंबा, पवार संदिप अशोक, सुर्यवंशी सुभाष भिला, मोरे रविंद्र गोरख, पवार राजेंद्र तुकाराम, सोसायटी - महिला राखीव गटातून देवरे मिनाक्षी अनिल, बोरसे भारती विनोद, सोसायटी वि.जा/भ.ज गटातून शिरोळे नंदलाल दशरथ तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे सोसायटी विभागात इतर मागास वर्ग गटातील चंद्रकांत धर्मा शेवाळे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे. 18 जागापैकी अकरा निकाल जाहीर झाले. त्यातील दहा जागा हिरे गटाने जिंकल्याने भुसे यांचा पराभव अटळ आहे.