Nashik News : गावातलं सुंदर वातावरण, अवखळली माणसं आणि त्यात आदिवासी संस्कृतीचा मेवा हे सगळं जुळून आलं, अन् सातासमुद्रापार आलेल्या पाहुण्यांना आदिवासी वाद्यांच्या तालावर नाचण्याचा मोह आवरला नाही. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यातील घाणीचापाडा येथे पाण्याचे ड्रम्स वाटप करण्यात आले. 


निमित्त होते, गुजरात सीमेवरील अति दुर्गम पाणीटंचाई गाव असलेल्या घाणीचा पाडा येथे वेल्स व व्हील्स (Well On wheels) या संस्थेने वॉटर फील ड्रम वाटप केले. यावेळी मूळचे भारतीय परंतु लंडन येथे स्थायिक झालेले मेघना व भावीन भट्ट (Bhavin Bhatt) त्यांची दोन मुले हर्ष व इशा तसेच वेल्स ऑन विल्स संस्थेच्या नेहा हरलाका, श्वेता हरलाका यांसह पाहुण्यांनी भेट दिली. आदिवासी संस्कृती जोपासत पाहुण्यांचे मोठे उत्साहात स्वागत करण्यात आले. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या पावरी तूर वाद्याचा ठेका पाहून पाहुण्याने देखील गावकऱ्यांच्या तालावर ताल मिळवत मनसोक्त नाचून आनंद साजरा केला. वेल्स ऑन विल्स संस्थेच्या मार्फत घाणीचा पाडा गावातला 28 कुटुंबांना पाण्याचे वॉटर फील ड्रम वाटप करण्यात आले. यामुळे आदिवासी महिलांना पाणी वाहण्याचे कष्ट सुसह्य झाल्याचे दिसून आले


दरम्यान घाणीचा पाडा हे गाव सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रात आहे. गावामध्ये प्राथमिक सोयी सुविधांचा अभाव असून उन्हाळ्यात गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते. अशावेळी गावातील महिला दुर दुर झऱ्यांच्या शोधात जंगलात जाऊन रात्रभर पाणी भरण्यासाठी जात असतात.  हि समस्या ओळखून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे व्यवस्थापक नारायण गबाले यांनी गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले. ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये. गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी, डोक्यावर हंडा कमरेवरूनही खाली यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात आला. 



दरम्यान पाण्याची समस्या असल्यामुळे अनेक मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून संस्थापक  शाझ मेनन यांच्या कृतीशील पुढाकाराने घाणीचा पाढा गावाला पाण्याचे वॉटर व्हील ड्रम वाटप करण्यात आले. यावेळी अमेरिकेहून आलेल्या भावीण भट यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे कौतुक केले. त्याचबरोबर आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी देखील दिले. संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता, तो वेळ वाचेल. महिलांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. या आधुनिक जगात देखील एवढी अती दुर्गम स्थिती व मूलभूत सुविधांचा अभाव पाहून खेद देखील व्यक्त केला.