Nashik News : सध्या नाशिक (Nashik) शहरात वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) हेल्मेट सक्तीही मोहीम जोर धरू लागली आहे. त्यातच अनेकांकडे वाहन परवाना नसल्याचे समोर येत आहे. अशातच जिल्ह्यातील वाहन परवाना नसलेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. जानेवारी महिन्यात नाशिक आरटीओ थेट आपल्या गावात येणार असून या ठिकाणी आपल्याला वाहन परवाना काढता येणार आहे. 


वाहन म्हटलं कि परवाना आलाच, मात्र अनेकदा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक परवाना न बाळगणे (Driving License), परवाना न काढने, परवान्याशिवाय वाहन चालविणे आदी प्रकार घडतात. यासाठी ऑनलाईन परवाना काढण्याची सुविधा देखील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अनेक वाहनधारक परवाना काढण्यासाठी टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून आता आरटीओ थेट जिल्ह्यातील महत्वाच्या शहरामध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून संबंधित तालुका शहरातील नागरिकांना आपल्या शहरात वाहन परवाना काढता येणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते पुढील वर्षभर हि सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांना सहज व सुलभ प्रक्रियेतून वाहन चालवण्याचे लायसन्स देणार आहेत यासाठी 2023 सालचा तालुका निहाय दौरा प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे घोषित करण्यात आला आहे शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यंदाही जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यापासून शिबिर होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली आहे.


नाशिक जिल्ह्यातील निफाड, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, घोटी, वणी, दिंडोरी, चांदवड या शहरांमध्ये जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत दर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथा आठवड्यात तालुका निहाय शिबिर होणार आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या वाहनधारकांना सहज जागेवरच वाहन चाचणी देता यावी, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ व पक्क्या परवानासाठी शिबिरे आयोजित केले आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त वाहनधारकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत लायसन्स विभागाचे ज्ञानेश्वर करंजकर यांनी केले आहे.


असा असेल तालुकानिहाय शिबीर दौरा
दरम्यान जानेवारी ते डिसेंबर महिन्यात आरटीओ विभाग हा पिंपळगाव, सिन्नर, येवला, निफाड, घोटी, लासलगाव, दिंडोरी, चांदवड, त्रंबकेश्वर, सुरगाणा, वणी या शहरात दाखल होणार आहे. दरम्यान या शहरांत महिन्यातील एक दिवस ठरवून शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात त्या त्या शहरांमध्ये दौरा आयोजित असून संबंधित नागरिकांनी परवाना काढण्यासाठी थेट घरापर्यंत सुविधा मिळणार आहे. दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, मतदान कार्ड, विज बिल, आपला रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्या वयाचा पुराव्यासाठी आपल्याला दहावीचे बोर्डाचे गुणपत्रक तसेच सर्टिफिकेट तसेच जन्म प्रमाणपत्र असले तरी देखील चालते. पॅन कार्ड देखील लागत असते.