Nashik Vinayak Mete : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अस्थींचे गोदाकाठी (Godavari) विसर्जन करण्यात आले. आज नाशिकच्या (Nashik) गोदा घाटावर असलेल्या ऐतिहासिक रामकुंड (Ramkund) येथे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या हस्ते विधिवत पूजा विधी करून अस्तींचे विसर्जन करण्यात आले. विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे तसेच अन्य कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विनायक मेटे यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नातेवाईक भावूक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघाती निधन झाले होते. त्यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांपासून विनायक मेटे यांच्या अस्थींची जिल्हाभर दर्शन यात्रा सुरू होती. आज 25 ते 26 दिवसानंतर नाशिकच्या गोदावरी नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसंग्राम पक्ष आणि मेटे परिवारासाठी त्या स्वतः ठामपने उभ्या राहतील असं अभिवचन दिले.
दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीत राज्यभरातील नागरिक अस्थि विसर्जनासाठी येत असतात. तर आज देखील विनायक मेटे यांच्या अस्थी गोदावरी नदीत विसर्जनासाठी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसेच शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील भावना व्यक्त करत मराठा समाजाचे कणखर नेतृत्व हरवले असून त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विनायक मेटे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी अरबी समुद्रात शिवस्मारक बांधावे तसेच विनायक मेटे यांच्या पत्नी यांना आमदारकी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
आज नेतृत्व हरपल्याने मराठा समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शब्द दिला होता की मेटे तुम्हाला लवकरच गिफ्ट मिळेल तर त्याचीच पुनरावृत्ती करण्यात यावी. मराठा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या संघटनांचे एकच म्हणणे आहे की श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांच्या पत्नींना आमदारकी द्यावी. राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून त्यांना पाठवावं आणि त्यांना मंत्रिपद देऊन मेटे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यात येईल, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांनी केली.
लेकीचा बाप हारपलाय!
आज मेटे यांच्या अस्थी विसर्जनासाठी राज्यभरातून जनसमुदाय नाशिकच्या गोदाकाठी आला आहे. आमचा आधार हरपला असल्याने आम्ही सर्वांनी ठरवलंय निश्चय केलाय की मेटे ताईंना सोबत घेऊन मेटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करू. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि अशा अनेक गोष्टीसाठी लढायचं आहे. एका लेकीसाठी तिचा बाप गेलेल्या आजच्या दिवशी बोलणं अवघड आहे. मेटे साहेबांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षणासाठी लढणार आणि लढत राहणार अशी ग्वाही यावेळी स्नेहा कोकणे पाटील यांनी दिली.