Nashik Ver Savarkar : नाशिकचं भगूर (Bhagur) गाव आजही सशस्त्र क्रांती लढ्याची साक्ष देत उभं आहे. येथील सावरकर वाडा, भगूर गाव स्वातंत्र्य चळवळीतील योगदान देणाऱ्या महत्वपूर्ण वास्तू म्हणून ओळखल्या जातात. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकरांचं जन्म गाव, हे भगूर गाव आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.


सावरकरांचा जन्म नाशिक (Nashik) जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकर (Veer Savarkar) हे नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र  या रचना लिहून काढल्या. तर स्वतः सावरकरांनी जन्मगावाविषयी आत्मचरित्रात भरभरून लिहून ठेवले आहे. 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातून सावरकर कुटूंबीय नाशिकच्या भगूरमध्ये स्थायिक झाले. याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण, शिक्षण याच ठिकाणी झाले. आज भगूर येथील सावरकर वाडा शासनाने ताब्यात घेत डागडुजी केली असून या ठिकाणी सावरकर स्मारक बांधण्यात आले आहे. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरा, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते .


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय योगदान दिलंच. त्याचबरोबर अनेक क्रांतीकारांचे ते प्रेरणास्थान होते. ब्रिटीश सरकारनं त्यांना काळे पाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवलं. अंदमानातून परत आल्यानंतर सावरकरांनी समाजसुधारणेसाठी मोठे कार्य केले. हिंदू धर्मातील जातीभेत दूर व्हावेत यासाठी सतत प्रयत्न केले. हिंदू महासभा या राजकीय पक्षाची स्थापना केली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. हे वाक्य जे फक्त बोलून थांबले नाहीत तर संपूर्ण आयुष्य ते या पद्धतीनं जगले. सावरकरांचे विचार हे नेहमीच प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जन्मगावातील घराला आजही अनेकजण नियमित भेट देतात.


भगूर येथे सावरकरांचे स्मारक 


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जुने घर राष्ट्रीय स्मारक झाले आहे. हे घर सावरकरांनंतर मारुतीराव चव्हाण यांनी खरेदी केले. पुढे ते पांडूबा चव्हाण यांनी घेतले व त्यांच्याकडून केंद्र सरकारने 28 मे 1998 रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. हा वाडा आवर्जून पाहण्यासारखा असून राज्य पुरातत्त्व खात्याकडून त्याची डागडूजी करण्यात आली आहे. याच परिसरात सावरकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले ती शाळा आहे. सावरकर वाड्यात सावरकरांच्या स्मृती जपून ठेवण्यात आल्या आहेत.