Nashik News : देशभरातील लहान मुलांसह तरुणाईमध्ये ऑनलाइन गेम्सचा (Online Games) विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे अनेकदा अनुचित प्रकार देखील समोर आले आहेत. या ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीसाठी (Online Games Ad) मराठीसह अनेक हिंदी कलाकार जाहिरात देखील करत आहेत. यामुळे तरुणाई गेम्सकडे आकर्षित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रकाश कनोजे या नागरिकाने चक्क अभिनेता अजय देवगणसाठी (Ajay Devgan) भीक मांगो आंदोलन उभारले आहे. 


हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने खासकरून लहान मुले आणि तरुण वर्ग ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या ऑनलाईन गेम्सची जाहिरात अनेक अभिनेते करत असल्याचे टीव्ही, सोशल मीडियाद्वारे दिसून येते. याच एका ऑनलाईन अँपसाठी (Online App) अभिनेता अजय देवगण देखील जाहिरात करत असतो. त्यामुळे ही जाहिरात करू नये, यामुळे असंख्य लहान मुले, तरुण या गेम्सच्या विळख्यात अडकत आहेत. यासाठी नाशिक येथील प्रकाश कनोजे यांनी अनोखे भीक मांगो आंदोलन (Bhik Mango Andolan) सुरु केले आहे. आंदोलन कशासाठी तर या भीक मांगो आंदोलनातून जे काही पैसे जमा होतील ते अजय देवगणला पाठविण्यात आले आहेत. हे अनोखे आंदोलन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 


दरम्यान लहान मुलांसह तरुणाई गेमिंगच्या जाळ्यात अडकली चालली आहेत. यातूनच मुलांच्या आत्महत्या (Suicide) सारख्या घटना देखील अलीकडच्या काळात समोर आले आहेत. त्यातच अनेक मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार या खेळांची जाहिरात करू लागल्याने तरुणाई याकडे आकर्षित होत आहे. म्हणूनच या मुलांना यापासून परवडत करण्यासाठी तसेच मुलांच्या गेमिंगच्या व्यसनाला लगाम घालण्यासाठी नाशिकच्या प्रकाश कनोजे यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. कनोजे यांनी भीक मांगो आंदोलन सुरू केल्यानंतर या आंदोलनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 



व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


कनोजे हे लॉन्ड्री व्यावसायिक असून सामाजिक जाणीव वेतन अशा प्रकारचे उपक्रम ते राबवत असतात. शिवजयंती, गणेशोत्सव मिरवणुकीचे अग्रभागी ते आपली स्कूटर घेऊन विविध विषयांवर जनजागृती करत असतात सध्या त्यांच्या आंदोलनाची चर्चा होत आहे. सध्याच्या भीक मांगो आंदोलनातून ते नाशिक शहरातील विविध भागात जाऊन जनजागृती करत आहेत. माईकच्या माध्यमातून ते अभिनेता अजय देवगनकडे खूप काही असूनही जाहिरातीद्वारे ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन देत आहे, अशा जाहिरातींचा तरुणावर वाईट प्रभाव पडतो आहे. म्हणूनच मी हे आंदोलन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जनजागृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


अनेकांचे संसार उघड्यावर


प्रकाश कनोजे म्हणतात की, ऑनलाईन गेममुळे अनेकजण कर्जबाजारी झाले असून अनेक जणांची घरे देखील उद्ध्वस्त झाली आहेत. हे पाहून मी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. केवळ अजय देवगणच नव्हे तर अनेक क्रिकेटपटू देखील खेळांच्या जाहिराती करत आहेत. पुढील आंदोलनात इतरही अभिनेत्री क्रिकेटपटू यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे.


देवाने यांना इतकं दिले. परंतु चुकीच्या जाहिरातीमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, हे कुठेतरी थांबावे याकरता हे आंदोलन करत असल्याचे कनोजे म्हणाले. दरम्यान आंदोलनातून त्यांच्याकडे जवळपास 204 रुपये जमा झाले होते, ते त्यांनी मनी ऑर्डर द्वारे पाठवले आहेत. त्याचबरोबर अजय देवगनला पत्र देखील पाठवले असून अशा प्रकारच्या जाहिरात बंद करण्याची विनंती या पत्राद्वारे केली आहे.