Nashik Godawari : एकीकडे गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मनपा प्रशासन, नमामी गोदा प्रकल्प, गोदावरी संवर्धन समिती आदींच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे गोदावरीत शहरातील पन्नास हुन अधिक ठिकाणांचे सांडपाणी नदी पात्रात मिसळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


नाशिकची गोदामाई म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. मनपा प्रशासनाच्या माध्यमातून नदी परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गोदा पात्रात स्मार्ट कामे केली आहेत. मात्र असे असताना शहरातील काही भागात गोदा पात्रात सांडपाणी मिसळले जात असल्याचा प्रकार खुद्द मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या पाहणीत समोर आले आहे.


गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असून यावर अनेकदा पर्यावरण प्रेमींनी आवाज ही उठवला आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त रमेश पवार यांनी स्वतः या परिसरात जाऊन पाहणी केली आहे. मनपा आयुक्तांनी अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर भाग तसेच गंगापुर जवळील मनपा हद्दीतील पाहणी केली. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या निदर्शनास असे आले की मनपाच्या भुयार गटार बाजूलाच मात्र अनेक ठिकाणी पाईप लाईनद्वारे गोदापात्रात गटाराचे पाणी सोडण्यात येत असल्याचर आढळले. 


महापालिकेचे नदी सर्वेक्षण
मनपा आयुक्तांनी गोडावरी नदी पात्रात फेरफटका मारला. यावेळी त्यांना दिसून आले की, 40 ठिकाणी पाईप लाईनद्वारे गटारीचे पाणी प्रवाही असल्याचे आढळले नाही मात्र उर्वरित 10 ठिकाणी सांडपाणी नदीत जात असल्याचे आढळून आले आहे.


येथे केली पाहणी
गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या दृष्टीने आयुक्त रमेश पवार यांनी बोटीने, पायी व वाहनाद्वारे अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर, गोवर्धन मनपा हद्दी पर्यंत पाहणी करून त्वरित त्यावर कार्यवाही  करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर ‘लोकल सोल्युशन’ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.