Nashik Kanda Parishad : नाशिकच्या (Nashik) निफाडमध्ये 1982 नंतर दुसऱ्यांदा कांदा परिषदेचे (Kanda Parishad) आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी (Sharad Joshi) यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या 05 जूनला रुईत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


सध्या कांद्याचे दर हे 1 रुपये ते 3 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहे. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा जनावरांना खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी काही दिवसांपूर्वी कांदा परिषद आयोजनाबाबत माहिती दिली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात 5 जून 2022 रोजी भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. 


निफाड हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1982 ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी 1982 साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, कांद्याला अनुदान मिळावा, हमीभाव मिळावा आदी मागण्यासंदर्भात या परिषदेत विचार मंथन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुई गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या 5 जुन रोजी कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. 


राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा, नाफेड कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा या प्रमुख मागण्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कांदा परिषदे प्रसंगी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून यामध्ये रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत. 


लासलगावची कांदा बाजारपेठ 
नाशिक सह पुणे, आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत कांदा उत्पादक शेतकरी देखील आहेत. एवढेच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे 05 जूनला होणाऱ्या कांदा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
  
मुख्यमंत्र्यांनी गावाकडं बघावं... 
राज्यातला कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब मागण्यासाठी येत्या पाच जूनला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद होत आहे. विशेष म्हणजे तब्बल 39 वर्षानंतर ही कांदा परिषद होत असून या परिषदेच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोश पाहायला मिळणार आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडंस गावाकडं बघावं, शेतकऱ्यांकडे बघावं, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी ऑनलाईन कांदा उत्पादकांसाठी एखादी बैठक घ्यावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत करावी. सरकार डोळेझाक करत असेल तर आम्ही याविरोधात आवाज उठवू असा इशारा खोत यांनी यावेळी दिला होता.