Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे पळसे येथील काही कार्यकत्यांनी नाशिक- पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) आंदोलन करत महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची तोडफोड करून चालक आणि वाहकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पळसे येथील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे कारावास आणि 20 हजार रुपयांची शिक्षा सुनावल्याची माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेंद्र बघडाने यांनी दिली.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्च 2016 रोजी दुपारच्या सुमारास त्रिमुर्ती प्लाझा समोर पुणेरोड पळसे नाशिकरोड येथे आरोपी गणेश गायधनी आणि बाळु चौधरी या दोघांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने (ED) अटक केल्याच्या निषेधार्थ युती सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. आंदोलन करताना दोघांना पुणेरोडवर बस क्रमांक एमएच 14 बीटी 4376 या बसला अडवून बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या होत्या. या प्रकरणी नाशिकरोड (Nashik) पोलिस ठाण्यात चालक रवींद्र गारकर यांच्या तक्रारीनुसार शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रस्ता अडवणे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात अशोकराव गायधनी, बाळू पुंजा चौधरी आणि समाधान भिकाजी सरोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल कार्यकत्यांनी आंदोलन करीत करण्यात आला होता. भुजबळ यांच्यावर आकसबुद्धी व सूडभावनेने कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत शिंदे पळसे येथे 17 मार्च 2016 रोजी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची तोडफोड करीत वाहक व चालकाला मारहाण केली होती. यातील समाधान सरोदे यांचा सुनावणीदरम्यानच मृत्यू झाला होता. दोघा आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार जिल्हा व सत्र गणेश न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गणेश गायधनी व बाळू चौधरी यांना दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान या घटनेत एसटी बसचे 16 हजार रुपयांचे नुकसाने झाले होते. त्यामुळे बसची नुकसानभरपाई म्हणून 15 हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याची माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजेंद्र बघडाने यांनी दिली. हवालदार साहेबराव शिरोळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 9 मध्ये या खटल्याची सुनावणी सुरु होती. न्यायाधिश एम.ए.शिंदे यांनी आरोपींच्या विरोधात फिर्यादी, साक्षीदार पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन दोघा आरोपींनी 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.