Nashik Lightning Strikes : नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. याचबरोबर शेतकऱ्याची बैलजोडीचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


नांदगाव तालुक्यातील तळवाडे या गावात चटका लावणारी घटना घडली आहे.  शांताराम निकम असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल सायंकाळच्या सुमारास तळवाडे परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. यावेळी निकम हे बैलजोडीसह शेतात काम करत होते. पाऊस आल्याने त्यांनी घराकडे जायचे ठरवले. निकम हे बैलांना घेऊन घराकडे येत असताना अचानक वीज अंगावर पडून शेतकरी निकम आणि त्यांच्यासोबत बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे निकम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शांताराम निकम यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दोन बैलांसह शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. यावेळी मालेगावच्या अनेक भागात अर्धा ते एक तास पावसाने हजारी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी काढणी करून उघड्यावर ठेवलेला कांद्याचे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडली. 


मालेगावसह परिसरात पाऊस 
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. मान्सून पूर्व पाऊस अद्यापही गोव्याच्या सीमेवर अडकून असून जिल्ह्यातील बळीराजाला पावसाची आस आहे.असे असताना नाशिकच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले असून मालेगाव शहरासोबत तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. 


कृषिमंत्र्यांचा सल्ला 
जूनचा पहिला आठवडा सरला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. मात्र मान्सून उशीरानं येत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.