Nashik Malegoan Bomb Blast : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (carnal Purohit) यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) नकार दिला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनआयए कोर्टात सुरू असलेल्या मालेगाव ब्लास्ट (Malegaon Bomb Blast) 2008 च्या खटल्याला स्थगिती देणार नाही. याचा पुनरूच्चार करत न्यायमूर्तीनी सोमवारी केला. बॉम्बस्फोट करणे हे तुमचं कर्तव्य नाही असेही हायकोर्टाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना सांगितले. 


मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून दोषमुक्त करावे अशी विनंती करणारी याचिका लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी दाखल केली आहे. पुरोहित यांनी केवळ आपले अधिकृत कर्तव्य बजावत असल्याचा आणि ‘अभिनव भारत’ बाबत माहिती गोळा केल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर हायकोर्टाने मालेगावमध्ये झालेला बॉम्बस्फोट का टाळला नाही असा प्रश्न केला. या बॉम्बस्फोटात निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले असून अनेकजण जखमी झाले होते, याकडे कोर्टाने लक्ष वेधले. बॉम्बस्फोटाच्या कृत्यात सहभागी होणे, याचिकाकर्त्याचे अधिकृत कर्तव्य नाही, असे न्या. ए.एस. गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले. 


मुंबई सत्र न्यायालयात असलेल्या एनआयए कोर्टात सध्या मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोटासंदर्भातील सुनावणी झाली. मंगळवारी या प्रकरणी आरोपनिश्चिती होणं अपेक्षित आहे. आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेसाठी सर्व आरोपींनी हजर राहण बंधनकारक असतानाही काही आरोपी खटला लांबवण्याच्या हेतूनं जाणूनबुजून वारंवार गैरहजर राहतात, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण शुक्रवारी एनआयए कोर्टानं नोंदवलं होतं. शुक्रवारी या सुनावणीसाठी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी हे दोनच आरोपी कोर्टात हजर होते.


दरम्यान एनआयए कोर्टाला आरोपनिश्चितीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने कर्नल पुरोहित यांच्या याचिकेवर एनआयएला 21 नोव्हेंबरच्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार आजच्या सुनावणीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीतांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला असून खटल्यातून दोषमुक्तीसाठी दाखल केलेला अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. त्या बैठकीला हजेरी लावताना पुरोहीत हे 'ऑन ड्युटी' नव्हते, असा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. लष्करी अधिका-याविरोधात खटला चालवण्यासाठी आवश्यक पूर्व परवानगी घेतली नसल्याचा पुरोहितांनी दावा केला होता. मात्र हायकोर्टानं हा दावा फेटाळून लावला आहे. 


काय आहे प्रकरण
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. भिकू चौकाजवळ मशिदीबाहेर पार्किगमध्ये एका दुचाकी मध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवण्यात आला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. भोपाळमधील साध्वी प्रज्ञा ठाकूरवर (Pradnya thakur) मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.