Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या हरिहर गडावर रविवारी सुट्टीच्या दिवशी गिर्यारोहक व पर्यटकांनी तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांना परतून यावे लागले सर्व अनेकांना असा जीवघेणा प्रवास नको असल्याचे सांगितले.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर व हौशी पर्यटकांची पाऊले हळहळू त्र्यंबकेश्वर, हरिहर गडाकडे वळू लागली आहेत. पहिल्या पावसांनंतरच्या रविवारी सुट्टीनिमित्त हजारो पर्यटकांनी हरिहर गडावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अतिशय अवघड चढण असलेल्या हरिहर गडावर पर्यटकांचा जीव धोक्यात घातल्याचे गर्दीवरून लक्षात येते.
दरम्यान यावेळी दुपारनंतर आलेल्या पर्यटकांनी गर्दी पाहून हरिहर गडाच्या मध्यावरूनच माघार घेत परतीच्या वाटेल लागले. तर काही पर्यटक गाड्या पार्क करून हरिहर गडावर निघणार तोच त्यांनी तोबा गर्दी पाहून हरिहर गडाचा बेत रद्द केल्याचे अनेकांनी सांगितले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर आता सर्व शिथिल झाले असून आतापासूनच पर्यटक गड किल्ल्यांवर गर्दी करू लागले आहेत. मात्र या पर्यटकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असून अनेकांच्या जीवाला धोकाही या माध्यमातून पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने सुरवात केली असली तरी अद्यापही तालुका जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलै -ऑगस्टच्या सुमारास त्र्यंबक परिसर हिरवा झालेला दिसून येतो. धबधबे वाहू लागतात. आणि हेच पर्यटकांना आकर्षित करत असते. मात्र यंदा पहिल्या पावसांनंतर पर्यटकांनी त्र्यंबककडे येण्यास सुरवात केली आहे. त्यातच दुर्लक्षित असलेला मात्र अलीकडच्या वर्षात सर्व परिचित झालेल्या हरिहर गडावर मात्र पर्यटक तोबा गर्दी करताना दिसून येतात. त्याचाच प्रयत्य कालच्या रविवारी आला.
पर्यटकांचा उत्साहीपणा
रविवारच्या सुट्टीनिमित्त हरिहर गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी तोबा गर्दी केली. यावेळी अवघड वाट असलेल्या, निमुळत्या टोकावरही पर्यटक उभे असल्याचे दिसून आले. तर चढणीच्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसल्याचे दिसून आले. अशा पद्धतीचा पर्यटकांचा उत्साहीपणा घातक ठरू शकतो. म्हणून पर्यटनाच्या सर्वच ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ठेवून मागील वर्षीप्रमाणे थेट गुणेच दाखल करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील वर्षांची पुनरावृत्ती
कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यात विकेंड लाॅकडाऊन सुरु होते. यावेळी अनेक पर्यटक ट्रेकींगसाठी घराबाहेर पडत हरिहर गड तोबा गर्दी केली होती. बेसुमार गर्दी झाल्याने वनविभागाने देखील पर्यटकांना फटकारले. त्यानंतर अनेक पर्यटकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवाय काही काळासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती.