Nashik News : नाशिकच्या (Nashik) पांडव लेणी (Pandav Leni) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या माय लेक पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. जवळपास एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या दोघांनाही रेस्क्यू (Rescue Operation) करण्यात यश आले आहे.


सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून विकेंड (Weekend) असल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यातच अशा अनुचित घटना घडत आहेत. नाशिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या त्रिरश्मी लेणी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. मात्र निसरड्या वाटा आणि अनोळखी रस्त्यांमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात सापडतो. 


दरम्यान नाशिकच्या पांडवलेणी गडाच्या उंचावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील कुटुंबातील वडील आणि मुलीचा अपघात झाला असून यात मुलगी किरकोळ जखमी झाली आहे तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कंबरेला फ्रॅक्चर झाले आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निस्वास सोडला. 


नेमकी घटना काय?
मुंबई येथून नवरा, बायको आणि दोन मुलींसह हे कुटुंब पांडव लेणी येथे फिरण्यासाठी आले होते. यावेळी लेणीवर फिरत असताना पाय घसरून पाच वर्षीय मुलीसोबत वडील खाली पडले. ही घटना नाशिक ट्रेकर्सच्या टिमला समजताच तासाभरातच त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.


तीन तासानंतर सुटका 
दरम्यान वडील व मुलगी पाय घसरून पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. कंट्रोल रूमच्या मिळालेल्या महितीनंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर खाजगी गिर्यारोहक यांच्या मदतीने व स्पेशल स्ट्रेचर च्या साहाय्याने व्यवस्थित पायथ्याशी आणून ॲम्बुलन्सने  खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे


पर्यटन करा, पण जपून....
सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत. अशावेळी माहितीचा अभाव, निसरड्या वाटा यामुळे पर्यटक धोका पत्करतात आणि अनुचित प्रकार घडतो. त्यामुळे पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी न जाता सुरक्षित पर्यटन करणे आवश्यक ठरते.