Nashik Crime : नाशिक शहरातील पंचवटी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पंचवटीत राहणाऱ्या पीडितेला लग्नाचे अमिष दाखवुन संशयिताने 2015 ते 2021 या काळात वारंवार शहरातील विविध भागात नेऊन अत्याचार केला. यावेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित तरुणीवर वारंवार अत्याचार केला. संशयिताने पीडित महिलेस वारंवार शिवीगाळ करत 'जर तु माझ्या सोबत आली नाहीतर तुझे व माझे फोटो व व्हिडीओ तुझ्या पतीला दाखविल' अशा प्रकारची धमकी देखील दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे की, संशयिताने पीडितेसोबत पीडितेच्या संमतीविना वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यानचे फोटो-व्हिडीओ काढले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं अनेकदा धमकावत वारंवार इच्छेविरोधात जाऊन संशयिताने अत्याचार केला, अशी फिर्याद करत पीडितेने पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पीडिता हा अत्याचार सहन करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र लग्न जमविण्याची प्रक्रिया सुरु असल्याने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. या प्रकरणी संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो दाखवून मोडले लग्न
दरम्यान तरुणीने दुसऱ्या मुलासोबत लग्न केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या पुरुषाने तिच्या सासरच्यांना दोघांचे फोटो व व्हिडिओ दाखवून ठरलेले लग्न मोडले. डिसेंबर 2021 मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. महिला सुरक्षा विभागने देखील 25 मे रोजी यासंबंधित पत्र पोलिसांना दिले होते.
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरांत अत्याचार आणि मुलींच्या अपहरणांमध्ये वाढ झाली आहे. कालच नाशिक शहरातून तीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी पोलीस स्थानकात दाखल आहे. त्याचबरोबर विवाहितेचा छळ, विवाहितेला मारहाण आदी घटना सातत्याने उघडकीस होत आहेत. यावरही नाशिक पोलीस लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
निर्भया पथक कुठंय?
नाशिक पोलिसांचे निर्भीड असलेले, महिलांच्या मदतीला तत्पर असलेले निर्भया पथक सध्या कुठं आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत कमालीची वाढ झालेली असताना निर्भया पथक कधी मदतीला येणार? असा सवालही महिला वर्ग करताना दिसत आहे.