Nashik Peacock Death : नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka) आमोदे येथील शिवारात दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची (Death) नोंद घेतली असून, विषबाधेमुळे या माेरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 
 

  
नांदगावपासून तालुक्यातील आमोदे शिवारातील येथील गिरणा आणि मन्याड नदीच्या परिसरात ही घटना घडली. दिपक पगार हे शेतात जात असताना विठ्ठल लाला पगार यांच्या शेतात काही मोर शेतात तडफडत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाला या संदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता जवळपास दहा मोर मृत्यु मुखी पडल्याचे आढळुन आले. 


आमोदे शिवारातील गिरणा-मन्याड नदीचे पात्र असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोरांची संख्या वाढलेली आहे. अन्न-पाण्याच्या शोधात हे मोर या भागात मोठ्या संख्येने येतात. शनिवारी या भागात अन्न-पाण्यासाठी दाखल झालेला मोरांचा थवा तडफडून मृत झाला. 10 मोरांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्य झालेल्यामध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी वेहेळगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अवशेष काढून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.


सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वन विभागाचे आरएफओ चंद्रकांत कासार, वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन के राठोड, आर के दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. 


मृत्यू नेमका कशामुळे?                                                                                                                                                                                                                                                                                                                                                आमोदे परिसरात सध्या पेरणीची कामे चालू असून कपाशी आणि मका पेरणी सुरु आहे. अशातच अन्न पाण्याच्या शोधार्थ आलेल्या मोरांनी पीक पेरा खाल्ल्याने विषबाधेमुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरे कारण सांगता येईल, असे आरएफओ चंद्रकांत कासार यांनी सांगितले.