Nashik New Year 2023 : नाशिक (Nashik) शहराला धार्मिक पौराणीक ऐतिहासिक शहर म्हणूनही ओळखले जाते. याच शहराला मंदिरांचे शहर म्हणून देशभरात नावलौकिक आहे. आता नववर्षांच्या स्वागतासाठी (New Year Celebration) पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे नाशिक शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या सह मंदिरांना भेट दिलीच पाहिजे. 


नाशिक शहराला धार्मिक वारसा लाभलेला असल्याने अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शहरभर असंख्य मंदिरे (Temples) पाहायला मिळतात. नाशिकमध्ये यंदा मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. नाशिकमध्ये पर्यटकांचा राबता सुरु झाला असून शहरात दाखल झाल्यानंतर पर्यटकांना मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यामुळे गोदाकाठ परिसरात असणाऱ्या आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या काही मंदिराची माहिती या बातमीतुन दिली आहे. 


नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीराजवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो. याच परिसरात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. 


काळाराम मंदिर
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. अस सांगतात कि काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या, जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून काळाराम मंदिराचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे. 


कपालेश्वर मंदिर
नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्याकाठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही. रामकुंड परिसरातून वरील बाजूस गेल्यास हे मंदिर पर्यटकांच्या दृष्टीपथात पडते. त्यामुळे रामकुंडावरील पर्यटन झाल्यानंतर पायी गेले तरी चालते. 


नारोशंकर मंदिर
नाशिकचे सरदार नारोशंकर राजे बहाद्दर यांनी रामेश्वर मंदिर बांधले. या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. हे मंदिर गोदाकाठी असल्याने घातांपासून मंदिराची शांतता अबाधीत राहावी यासाठी पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावी. या हेतूने मंदिराच्या सभोवताल एक भक्कम दगडी भिंत उभारले आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला त्यावेळी वसईच्या किल्ल्यांमधील चर्चेच्या घंटा या लढायचे स्मरण राहावे म्हणून पेशवे घेऊन आले. त्यातील एक घंटा या मंदिरात ठेवण्यात आली आहे. आजही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे. त्याचबरोबर येथील नाशिकच्या गोदावरीच्या पुराचे प्रतीक म्हणूनही या घंटेकडे पाहिले जाते. 


सुंदर नारायण मंदिर
भगवान विष्णू यांचे एकमेव सुंदर नारायण मंदिर नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे गोदावरी नदी किनाऱ्याजवळ आहे. ऐतिहासिक कलाकुसर, रेखीव आणि आखिव अप्रतिम काम, दगडी बांधकाम आणि लाकडाचा केलेला खुबीने वापर अशी ओळख असलेल्या या मंदिराचे सौंदर्य काही औरच आहे. मुघल काळात या मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पण, गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या सौंदर्याला आणि कलाकुसरीला नजर लागली आहे. सध्या या मंदिराचे काम सुरु असून तरीदेखील मंदिराचा वारसा आणि ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी एकदा या मंदिराला भेट दिलीच पाहिजे. 


गंगा गोदावरी मंदिर
गोदावरी रामकुंड परिसरात प्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे. गोदावरी पात्रात हे मंदिर असल्याने दरवर्षी पावसाळयात या मंदिराला पुराचा वेढा असतो. विशेष म्हणजे हे मंदिर दार बारा वर्षांनी उघडते. तर सिंहस्थ काळात हे मंदिर 1 वर्षासाठी उघडे असते. मंदिरात गंगा गोदावरी मातेची स्वयंभू मूर्ती असून, मंदिराच्या समोरच्या गाभाऱ्यात गौतमी ऋषींची मूर्ती आहे. 


देव मामलेदार मंदिर 
यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचा नाशिक येथे मृत्यू झाला. नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला ‘यशवंतराव महाराज पटांगण’ असे नाव दिले. तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनापासून 15 दिवस यात्रोत्सव सुरु असतो. सद्यस्थितीत येथील यात्रा सुरु असून लाखो भाविकांची मांदियाळी असते.