Nashik Chhagan Bhujbal : जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्यात कुठलेही वाद नाहीत. अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला नाही, पण आम्ही सगळे बरोबर असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. जयंत पाटलांना मी पण फोन केलेला नाही, म्हणजे मी त्यांच्या सोबत नाही, असे नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सगळे भाऊ असून लहान मोठा हे कशावरुन ठरवायचे? तिन्ही भाऊ एकत्र बसून सूत्र ठरवणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत. 


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज नाशिकमध्ये (Nashik) होते त्यावेळी त्यांनी माध्यमाशी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी महाविकास आघाडी, अनिल देशमुख, कांदा दर, नितेश राणे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाजपमध्ये जाण्यासंदर्भांत चर्चा सुरु आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले, "याबाबत अनिल देशमुखांनाच (Anil Deshmukh) विचारा, कुणाला ऑफर येते का माहिती नाही, मला कल्पना नाही. पण तिकडे गेले तर माणसासहित कपडे धुवून निघता. तसेच दोन दिवसांपासून नवीन संसद भावनांबद्दल राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले, जुन्या संसद भवनाचे वेगळे स्थान असून आता नवनवीन केले जात आहे. पॉलिसी आणि देश चालवणारे पहिल्या क्रमांकाचे भवन आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे. राष्ट्रपतीच्या हस्ते उद्घाटन महत्वाचे असून पंतप्रधान हे पक्षाचे लेबल असते. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे, असे मत भुजबळांनी व्यक्त केले. 


तसेच आज उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. त्याचबरोबर एकत्र येऊन त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. या सगळ्या घडामोडींवर भुजबळ म्हणाले की, मान आणि केजरीवाल हे महाराष्ट्रात येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असून मी त्या बैठकीला जाणार आहे. काही निर्णयाचा विरोधात सगळे येण्याचा उद्देश असून सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे, अशी विरोधकांची धारणा आहे. त्यामुळे बदलीपेक्षा आपण काही करु शकत नाही. अधिकाऱ्यांच्या हातात नाड्या असल्या पाहिजे. दुसरीकडे दिल्लीत दात, नखं काढून घेण्याचा प्रकार घडला असून या पार्श्वभूमीवर केजरीवाल सगळ्यांना जाऊन भेटत असल्याचे भुजबळ म्हणाले. 


त्र्यंबकच सत्य तपासणीत समोर येईल 


तर कालच आमदार नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भेट देत मंदिरात महाआरती केली. यावर भुजबळ म्हणाले की, वर्षानुवर्षाची ही परंपरा असून तपासणीत सर्व समोर येईल, अशी माहिती पुजारी आणि ग्रामस्थांनी दिली असल्याचे भुजबळ म्हणाले. तर सध्या नाशिक मुंबई रस्ता खराब झाला असल्याचे चित्र आहे. यावर ते म्हणाले की, पूर्वी तीन तासात जायचो, आता सहा तास लागत असून भिवंडी बायपासला मोठा त्रास होत आहे. वेअर हाऊसिंगच्या लोकांनी तिथं असलं पाहिजे. पुण्याला जाताना मी घाटात अडकलो होतो. लोकांचा वेळ, पेट्रोल आणि त्रास सगळं प्रवाशांना सहन करावे लागत आहे. तर राज्यात सातत्याने कांदा भाव घसरण होत असल्याचे चित्र आहे. यावर ते म्हणाले की, लोकांनी टोमेटो फेकून दिले. साखरेचे ही भाव पडले. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट रेटची मोठी तफावत आहे. कांदा, कापूस आणि साखरची तफावत भरुन काढा, असे आवाहन देखील राज्य शासनाला भुजबळांनी केले.