Nashik Igatpuri : काही दिवसांपूर्वी इगतपुरीच्या (Igatpuri) कसारा घाटात गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून एकाच दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा सिन्नर घोटी मार्गावर गंभीरवाडी जवळ दोन जणांना गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांनाही जवळच्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना एकाचा मृत्यू झाला आहे. 


इगतपुरी परिसरातील (Igatpuri) पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असून आजच्या घटनेने पुन्हा परिसर हादरला आहे. सिन्नर-घोटी महामार्गावरील (Sinnar-Ghoti Highway) गंभीरवाडी जवळ गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना अज्ञात दहा ते पंधरा जणांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी त्यांना जवळच असलेल्या धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात (SMBT Hospital) पुढील उपचारासाठी दाखल केले होते, यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घोटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत. 


इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे (Ghoti Police Station) हद्दीत असलेल्या एसएमबीटी कॉलेजजवळ ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री साडे दहाच्या सुमारास गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून हे प्रकरण घडले. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा एकजण गंभीर स्वररूपात जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधीक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन रात्रीतून 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. अशा घटनांमधील मुख्य समाज कंटकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी अशीच घटना 


पंधरा दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. कसारा घाट परिसरात एका जमावाकडून गोमांस वाहतूक तस्करीच्या संशयातून वाहन अडवण्यात आले होते. यावेळी दोन गटात झालेल्या बाचाबाचीत दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आले. यावेळी जमाव मारहाण करीत असल्याने एक जण जीव वाचवण्यासाठी आंधारात पळून गेला. मात्र अंधारात पळताना तो थेट 250 फुट खोल उंटदरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेने इगतपुरीसह घोटी परिसर हादरला आहे.