Sabhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) विचार महाराष्ट्र विसरला (Maharashtra) आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू असून हिंदू-मुस्लिमांमध्ये जे काही सुरू आहे, ते काही शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नाहीत. महाराष्ट्राने महापुरुषांची जी संस्कृती दिली आहे, त्याचे आचार-विचार कुणीही करत नाही, अशी घणाघाती टीका संभाजीराजे छत्रपती (Sabhajiraje Chhatrapati) यांनी केली आहे. 


संभाजीराजे छत्रपती आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीला अनुसरून आपली भूमिका मांडत रोष व्यक्त केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, कालपासून तब्येत खराब आहे. पण शाहू महाराजांचा कार्यक्रम असल्याने मी चुकवू शकत नाही. ज्यावेळी माणूस आजारी पडतो, त्यावेळी घराची आठवण येते. म्हणून मी कोल्हापूरला जाणार होतो. पण हा कार्यक्रम चुकला असता, तर समाधान वाटलं नसतं. मी या घराण्यात जन्मलो. या घराण्याने मला शिकवलं की, आयुष्यभर सामाजिक काम करणे गरजेचे आहे. दुर्देवाने सध्याच्या या राजकीय परिस्थितीत या महापुरुषांना महाराष्ट्र विसरत आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराज (Shiwaji Maharaj) यांच्या नंतर 200 वर्षांनी राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला न्याय दिला. या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला शाहू महाराज यांनी देणगी दिली आहे. तुम्हाला संभाजीराजे आवडत नसतील, पण शाहू महाराज यांच्या नावाने एकत्र येणे गरजेचं आहे. ज्यावेळी मी मराठा आरक्षण या विषयावर बोलतो त्यावेळी मला काही जण म्हणतात, तुम्ही बहुजन शब्द वापरू नका. पण गरीब मराठा लोकांना आरक्षण मिळणे आणि सगळ्यांना एका छताखाली आणण्याचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाहीत... 


ओवैसी यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधून औरंगजेब नावाच्या घोषणा देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यावर संभाजीराजे म्हणाले की, कुणी कसं काय त्याच नाव घेऊ शकतं? शिवाजी महाराजांना ज्या माणसाने त्रास दिला, संभाजीराजे यांची हत्या केली, त्याचं कुणी कसं कौतुक करू शकतं? असा सवाल उपस्थित करत हे दुर्दैव आहे, हे काही महाराष्ट्राचे संस्कार नसल्याचे ते म्हणाले. तर वंचित पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर भेट दिली. यावर संभाजीराजे म्हणाले की, तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केलं होतं, असा दाखला देखील त्यांनी यावेळी दिला. 


शाहू महाराजांचे विचार महाराष्ट्र विसरला आहे का? 


'मी शब्द पाळतो, म्हणून तब्येत बरी नसतानाही आलो. शाहू महाराज यांच्याशी संबंधित कार्यक्रम आहे. शाहू महाराजांचे विचार महाराष्ट्र विसरला आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. हिंदू-मुस्लिम जे काही सुरू आहे, ते काही शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नाही. महाराष्ट्राने महापुरुषांची जी संस्कृती दिली आहे, त्याचे आचार-विचार कुणीही करत नाही, असे माझे स्पष्ट मत असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पावसाच्या पाण्याचे प्लॅनिंग केले पाहिजे, पाणी व्यवस्थापनाचे नियोजन पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रात नियोजन व्हावे, असेही ते म्हणाले. 


ही बातमी वाचा:


Sangli News : महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तीद्वेषाचे राजकारण; त्यामुळेच स्वराज्य संघटनेची स्थापना : संभाजीराजे छत्रपती