Nashik Sharad Pawar : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राचे योगदान अतिशय महत्वाचे असून महाराष्ट्रात अनेक उत्तम शैक्षणिक संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या मागे राज्यातील सामान्य माणूस उभा आहे हे वेगळंपण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.


नाशिकच्या (Nashik) कवी कालिदास कला मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते मवीप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचा (Nitin Thackeray) नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. शरद पवार म्हणाले की, देशात नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे. यामध्ये काही नवीन बाबी समोर येत आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या धोरणातील चांगल्या गोष्टी घेण्यासाठी चर्चा करावी. पुढची पिढी समृद्ध होण्यासाठी या शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. नवीन पिढी समृध्द होण्याबरोबरच नवनवीन क्षेत्रात जाऊन काम करू शकली पाहिजे असे त्यांनी सांगितले.


शरद पवार म्हणाले की, देश शेतीप्रधान देश आहे. पूर्वी 35 टक्के लोक शेती करत होते. आता 56 टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहेत. मात्र पूर्वी शेती क्षेत्र किती होते आणि आता किती आहे. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेतीवर अधिक बोजा असून शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मोठ योगदान दिलं. शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन शेतीला समृध्द करण्याची दृष्टी दिली. त्यानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टी द्यावी असे त्यांनी सांगितले.


नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन संस्थेच्या वाटचालीत डॉ. मो. स. गोसावी यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. यासह मराठा विद्या प्रसारक समाज यासह अनेक संस्था कार्यरत आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था ही महाराष्ट्राला प्रतिष्ठा देणारी, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची धुरा नितीन ठाकरे सांभाळत आहेत. यापुढील काळात जगभरातील विद्यापीठांशी जोडून संस्था काम करेल असे त्यांनी सांगितले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये एका चौकटीच्या बाहेर जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.


छगन भुजबळ म्हणाले... 


महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारी मविप्र ही संस्था आहे. या संस्थेने बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाड खुली केली. अनेक समाज धुरिनिणी आपलं योगदान दिलं आहे. या संस्थेची धुरा ॲड. नितीन ठाकरे यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असून संस्थेची पुढची वाटचाल ही महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा घेऊन कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.